ट्रम्प यांचा एक निर्णय अन् काँग्रेस भडकली, पण का? मोदी सरकारकडे केली मोठी मागणी!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाजा पट्टीसंदर्भात केलेल्या एका विधानावरून काँग्रेस नेते जयराम रमेश भडकले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर टीका करत, ते 'अस्वीकार्य' असल्याचे रमेश यांनी म्हटेल आहे. तत्पूर्वी, "अमेरिका, युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीचा ताबा घेईल, तिचा आर्थिक पुनर्विकास करेल आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन करेल," अशा आशयाचे विधान ट्रम्प यांनी केले होते. ट्रम्प यांच्या याच विधानावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले, जय राम रमेश? -
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या एका पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटेल आहे, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गाझाच्या भविष्यासंदर्भात केलेले विधान अजब, धोकादायक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. केवळ दोन-राज्यांचा पर्यायच पॅलेस्टिनी नागरिकांचे स्वातंत्र्य आणि त्यांची सन्मानाने जगण्याची कायदेशीर आकांक्षा पूर्ण करू शकतो, तसेच इस्रायलची सुरक्षितताही सुनिश्चित करू शकतो. हाच पश्चिम आशियातील शाश्वत शांततेचा एकमेव मार्ग आहे. या प्रकरणात, मोदी सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट करायला हवी," असेही रमेश यांनी म्हटले आहे.
कायम म्हणाले होते ट्रम्प? -
ट्रम्प म्हणाले होते, "अमेरिका गाझा पट्टीचा ताबा घेईल, तेथील धोकादायक शस्त्रास्त्रे नष्ट करेल, उद्ध्वस्त इमारती हटवून या भागाच्या आर्थिक विकासासाठी काम करेल आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन करेल." ट्रम्प यांच्या या घोषणेवर, जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हमासचा वरिष्ठ अधिकारी सामी अबू जुहरी म्हणाला, "गाझाचा ताबा घेण्याची ट्रम्प यांची इच्छा हास्यास्पद आहे आणि अशा कोणत्याही विचाराने या भागात आगडोंब उसळू शकतो. गाझातील लोक, अशा कोणत्याही योजनेला यशस्वी होऊ देणार नाहीत."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.