नागपूर : महसूल विभागाने अखेर ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू केली आहे. यात नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा समावेश आहे.
येत्या काही वर्षात या अधिकाऱ्यांना सनदी अधिकारी पदावर पदोन्नती मिळणार असल्याचे सांगण्यात येते. सप्टेंबर महिन्यात २० वर निवडश्रेणी लागू असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सनदी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली. त्यानंतर महसूल विभागाने ६५ वर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला. परंतु हा प्रस्ताव नुसताच धूळखात होता. अखेर मंगळवारी ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू करण्याचा आदेश काढण्यात आला.
उपजिल्हाधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू झाल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही जण उपजिल्हाधिकारी पदावर गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे आता त्यांना पदोन्नती मिळणार आहे. जवळपास ६० उपजिल्हाधिकाऱ्यांची 3 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.