जिल्हा परिषदेत ४ कोटींचा घोटाळा :, लिपीक नाना कोरडे अटकेत
अलिबाग :- रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा, अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहायक लिपीक नाना कोरडे याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कोरडे याने तब्बल ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचार्यांचा पगार देण्यात येतो. पगार व कर्मचार्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत.
याचा गैरफायदा नाना कोरडे याने घेतला. त्याने धनादेशांवर वरिष्ठ अधिकारी यांच्या बनावट सह्या केल्या आणि इतर कर्मचार्यांच्या खात्यात पगाराव्यतिरिक्त अन्य फरकाची रक्कम टाकून स्वतःच्या तसेच पत्नीच्या खात्यात वळती करुन घेतली आहे. मार्च अखेर आल्यामुळे जिल्हा परिषदेचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन सुरु असताना हे प्रकरण लक्षात आले आणि नाना कोरडेचे बिंग फुटले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कोरडे याने ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे म्हटले आहे. कोरडे याच्याकडे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांचे वेतन देयक तयार करण्याचे पद असताना त्याने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२४ पर्यंत कर्मचारी यांचे वेतन देयकामध्ये वाढीव वेतन देयक म्हणून एकूण ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ रुपये असे फरकाची बनावट वेतन देयक बनवून सदरची रक्कम ही बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे असलेल्या खात्यात जमा असताना बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या खोट्या सह्या करुन सदरची रक्कम स्वत:च्या व इतर अशासकीय इसमांच्या वेगवेगळ्या खात्यावर घेऊन अपहार केला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक किशोर साळे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.