पालघर : दहावीच्या परीक्षा जवळ आल्यामुळे सगळ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभांना सुरूवात झाली आहे. शेवटचं वर्ष असल्यामुळे विद्यार्थी साश्रू नयनाने शाळेला निरोप देत आहेत, पण याच निरोप समारंभामध्ये आपल्या आवडत्या शिक्षकाच्या मृत्यूचं दु:ख विद्यार्थ्यांना पचवावं लागलं आहे.
पालघरच्या मनोर येथील लालबहाद्दुर शास्त्री हायस्कूलमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. संजय लोहार असं मृत्यू झालेल्या शिक्षकांचं नाव आहे. संजय लोहार हे शिक्षक 47 वर्षांचे होते. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू असताना विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी शिक्षक त्यांना शुभेच्छा देत होते. सगळे शिक्षक पोडियमवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाषण करत होते. संजय लोहार सरांनीही त्यांच्या भाषणाला सुरूवात केली, पण काही वेळातच ते पोडियमसह खाली कोसळले.
संजय लोहार यांना भाषण करत असतानाच हृदयविकाराचा धक्का लागला. यानंतर संजय लोहार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मंगळवारी दुपारी शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू असताना एक वाजण्याच्या सुमारास संजय लोहार यांना हृदयविकाराचा धक्का आला. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतानाच संजय लोहार सर कोसळल्यामुळे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हळहळ व्यक्त करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.