मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार, कामगारांना मोठा दिलासा
मिरज : मिरजेतील बंद पडलेल्या ऐतिहासिक वॉन्लेस हॉस्पिटलचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पक्षाचे नेते विनोद निकाळजे यांच्या नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट संस्थेकडे हस्तांतरण होणार आहे.
वॉन्लेस हॉस्पिटल चालविण्यासाठी लवकरच सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे वॉन्लेस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय पंढरी अशी ओळख असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मिरजेतील सुमारे १३० वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वॉन्लेस रुग्णालय गेली तीन वर्षे आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये मिरजेत वॉन्लेस (मिशन) रुग्णालयाची स्थापना करून आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा प्रारंभ केला.
डॉ. वॉन्लेस यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले. १९६२ मध्ये मिशन रुग्णालयाच्या सहकार्याने मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवर लोक मिरजेला उपचारासाठी येत असल्याने मिशनचा राज्यात व देशातही लौकिक होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या ऐतिहासिक मिशन हॉस्पिटलचे अस्तित्व धोक्यात आहे. रुग्णालयातील चारशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे. पगार नसल्याने रुग्णालय कर्मचारी हवालदिल आहेत.
खासगी संस्थेचा पुढाकार
थकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज व पाणीपुरवठाही खंडित केला होता. या पार्श्वभूमीवर विनोद निकाळजे यांच्या खासगी संस्थेने हॉस्पिटल चालवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या संस्थेकडे वॉन्लेस रुग्णालयाच्या हस्तांतरणासाठी बैठक पार पडली आहे.
कामगारांना दिलासा
मिशन हॉस्पिटल नवीन व्यवस्थापनाखाली सुरू होणार असल्याने येथील कामगारांना दिलासा मिळाला आहे. रुग्णालयातील कामगारांचे सुमारे २५ कोटी थकीत वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. दोन आठवड्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रुग्णालयाची पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती 'रिपाइं'चे नानासाहेब वाघमारे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.