पालघर : जिल्ह्यात रस्त्यासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला. त्याबाबत त्यांनी पुराव्यानिशी माहिती देत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच कार्यकारी अभियंत्यांना गुन्हे
दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांच्या तक्रारीनुसार शाखा अभियंता नीलकंठ
कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
विक्रमगड तालुक्यातील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा आढावा घेण्यासाठी विवेक पंडित यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत आदिवासी विकास कामांचा आढावा घेण्यात आला. आदिवासी उपयोजनेतून रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला होता.
एकाच रस्त्याचे फोटो अनेक ठिकाणी
दरम्यान रस्ते गैरव्यवहाराची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे निर्देश पंडित यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता विष्णू बोरसे आणि शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांनी अहवाल सादर केला. विवेक पंडित यांच्या माहितीनुसार अहवालात बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असून एकाच रस्त्याचे फोटो अनेक ठिकाणी वापरून रस्त्याचं काम झाल्याचं दाखवण्यात आलं.
शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आढावा बैठकीतच पंडित यांनी तत्कालीन उपअभियंता आणि शाखा अभियंत्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. त्यानुसार उपविभागीय अभियंत्यांनी चौकशी करून याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार केली. जिल्हा परिषदेचे उपअभियंता मनोज अंभोरे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोकाटे यांच्या विरोधात अनेक कामांच्या तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा आणि बनावट दस्तावेज तयार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.