मंचर, (पुणे) : शेवग्याच्या शेंगा तोडल्याचा व जमिनीच्या वादातून सख्या भावाने व त्यांच्या मुलांनी मारहाण करून सख्या भावाला मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. साबरेमळा-महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता. 26) सकाळी आठ वाजता हि घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
चंद्रकांत सदाशिव चासकर (वय 69, रा. महाळुंगे पडवळ) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. तर भाऊ सुभाष सदाशिव चासकर, भावजय मंदा सुभाष चासकर, पुतणे सचिन सुभाष चासकर आणि नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा मुलगा किरण चंद्रकांत चासकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत चासकर व सुभाष चासकर यांच्या सामायिक शेत जमिनीची वाटणी न झाल्याने शेतजमिनीवरून चंद्रकांत चासकर व त्यांचा भाऊ सुभाष चासकर यांच्यामध्ये वाद सुरू आहे. मंगळवारी (ता. 25) सायंकाळी चंद्रकांत चासकर, पत्नी नंदा चासकर, सून रूपाली चासकर तसेच किरण चासकर हे शेतातील शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुभाष सदाशिव चासकर याने शिवीगाळ दमदाटी करत रूपाली चासकर यांच्या हातातील शेवग्याच्या शेंगा ओढून घेतल्या. किरण चासकर यांनी विचारणा केली असता पुण्यावरून मुलांना बोलावून घेऊन तुमच्याकडे बघतो अशी धमकी सुभाष चासकर याने दिली.
बुधवारी सकाळी चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सुभाष चासकर, भावजय मंदा सुभाष चासकर, पुतणे सचिन सुभाष चासकर, नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर हे सर्वजण आले. शिवीगाळ दमदाटी करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन खाली जमिनीवर पाडले. त्यानंतर चौघांनीही त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, वडिलांना वाचवण्यासाठी किरण चासकर पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन चंद्रकांत चासकर हे बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.