Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरमध्ये मोठा स्कॅम, तब्बल 57 कोटी 4 लाख रुपये अज्ञात भामट्याने केले गायब, टेक्निक पाहून सगळेच हादरले

कोल्हापूरमध्ये मोठा स्कॅम, तब्बल 57 कोटी 4 लाख रुपये अज्ञात भामट्याने केले गायब, टेक्निक पाहून सगळेच हादरले


कोल्हापूर : 'सायबर चोरांपासून सावध राहा', असं कुणालाही फोन केला तर रिंगटोन ऐकू येते. पण तरीही सायबर चोरट्यांना काहीच फरक पडत नाही. अशातच कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

जिल्हा परिषदेची 57 कोटी 4 लाख 40 हजार 786 रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने बनावट चेकद्वारे ही फसवणूक केली आहे. सुदैवाने ही रक्कम सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा परिषदेची 57 कोटी 4 लाख 40 हजार 786 रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. अज्ञात व्यक्तीने फोकस इंटरनॅशनल, जीसीएसएसपी प्रायव्हेट लिमिटेड, Trinity इंटरनॅशनल यांच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवण्यासाठी बनावट धनादेश आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांचा बनावट धनादेश स्टॅम्प बनवून धनादेशावर खोटी स्वाक्षरी करून ही फसवणूक करण्यात आली आहे. 18 जानेवारी ते 21 फेब्रुवारी यादरम्यान केडीसी बँकेतील जिल्हा परिषदेच्या बँक अकाउंटवरून ही फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

हा प्रकार लक्षात येताच जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात पाटील यांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शाहूपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 336 (3) , 338 यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

कशी झाली फसवणूक

अज्ञात इसमाने फोकस इंटरनॅशनल आणि GCSSP यांच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले
मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांचे बनावट स्टॅम्प आणि सही केली
चेकही बनावट तयार केला
जिल्हा बँकेत चेक भरून तो वटवला
57 कोटी 4 लाख 40 हजार,786 रुपयांचा गैरव्यवहार झाला

सर्व ५७ कोटींची रक्कम गोठवली


दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. फसवणूक झालेली जिल्हा परिषदेची 57 कोटींची रक्कम सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित कंपन्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेने खाती गोठवली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जिल्हा बँकेने तात्काळ कारवाई करत 57 कोटी 4 लाख 40 हजार 786 रुपयांची रक्कम सुरक्षित करण्यात यश मिळवलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांकडून याबद्दल प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. पण ३ बनावट धनादेशाद्वारे आर्थिक फसवणूक झाली होती. सर्व रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यावर वळवण्यात यश आलं आहे. जिल्हा परिषदेला गंडा घालणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.