अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निर्माण झालेल्या वादात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उडी घेतली. तर शिवराज राक्षे यांने पंचाला लाथ न घालता गोळ्या घालायच्या पाहिजे होत्या अशी संतप्त टीका केली होती. ज्यानंतर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा यावरून भाष्य करताना, शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील निलंबन रद्द करा अन्यथा आपण मानाच्या गदा परत करू असा इशारा दिला होता. यामुळे महाराष्ट्र केसरीचा वाद आणखीन चिघळला होता.
यानंतर आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वादावर पडदा टाकण्यासाठी चंद्रहार पाटलांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी सांगलीच्या मातीत पै. पृथ्वीराज मोहोळ आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेला मल्ल पै. शिवराज राक्षे यांच्यात लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील वाद सांगलीत संपेल, असा विश्वास चंद्रहार यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले, ''सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर हे मल्लयुद्ध होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारीला सुरवात केली आहे. शिवराज लढायला तयार होताच, आज पृथ्वीराज मोहोळ यानेदेखील होकार दिला आहे. कुस्ती शौकिनांच्या मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात चुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून जी सल आहे, ती दूर होईल. शौकिनांना एक चांगली कुस्ती पहायला मिळेल आणि वाद बाजूला ठेवून मल्ल नेहमी पुढे जात असतात, हा संदेश महाराष्ट्रभर जाईल.
एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीच्या निकालाने शिवराज राक्षे यांच्या करिअरला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घटनेने महाराष्ट्रातील कुस्ती बदनाम होऊ नये, याची काळजी घेणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी हे मल्लयुद्ध आवश्यक होते. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.'' ते म्हणाले, दोन्ही मल्लांनी अत्यंत सकारात्मक विचाराने या कुस्तीसाठी होकार दिला आहे. त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे मानधन आम्ही देणार आहोत. वाद या दोन मल्लांचा नव्हता आणि नसेल. दोघांनीही कुस्तीची सेवा केली आहे, पुढेही करणार आहेत. त्यांच्यातील या लढतीमुळे त्यांच्या मनावरील दडपणदेखील दूर होईल. सध्या निर्माण झालेले मतभेद, मनभेद दूर होतील, अशी अपेक्षा आहे.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.