गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊत घडली. तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी लिव्ह इन पार्टरनवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी पहाटे लखनऊतील अपेक्स ट्रामा सेंटरजवळ तरुणी जखमी अवस्थेत आढळून आली होती. तिच्या डोक्यासह शरीरावर जखमा होत्या. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भावाने तिच्या लिव्ह इन पार्टनरवर हत्येचा आरोप केला आहे.
रायबरेलीत राहणारा गीता शर्मा तिच्याच गावातील गिरीजा शंकर पालसोबत पीजीआय परिसरात निलगिरी अपार्टमेंटमध्ये राहत होती. दोघेही जवळपास १० वर्षांपासून लिव्ह इनमध्ये होते. गीताचा भाऊ लालचंद याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गिरीजा शंकर पालने सकाळी साडे नऊ वाजता गीताच्या मृत्यूबाबत कुटुंबाला सांगितलं.
गिरीजा शंकरला गीतासोबत लग्न करायचं होतं. पण दोन वर्षांपासून तो लग्न करण्याचं टाळत होता. त्याने लग्नाच्या बहाण्याने आणि दबाव टाकून गीताकडून १३ लाख रुपये घेतल्याचा दावाही गीताच्या भावाने केला. गिरीजा शंकर आधीपासून विवाहित आहे. त्याने गीताच्या नावे विमा काढला असून यात तिला वारस केलं आहे यामुळे गिरीजावर गीताच्या कुटुंबियांचा संशय आहे.
गिरीजाने कट रचून गीताचा खून केला. तिच्या नावावर असलेल्या विम्याचे पैसे मिळावेत आणि लग्नही करायला लागू नये यासाठी तिची हत्या केली असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. कुटुंबियांनी गिरीजा शंकर पाल याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.