तिरुपती मंदिर चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, दुर्घटनेचे कारण समोर; व्हिडिओ पहा
तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. तामिळनाडूतील सालेम येथील एका महिलेसह चार भाविकांना यामध्ये जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान गंभीर जखमीमधील दोघांचा मृत्यू झाला असून आता मृतांचा आकडा 6 झाला आहे.
दक्षिण भारतात तिरुपती बालाजी प्रसिद्ध देवस्थान आहे. जिथे जगभरातील भाविकांची कायम गर्दी असते. याच तिरुपतीच्या मंदिरात वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी दुर्दैवी घटना घडली. गर्दी एवढी झाली की नियंत्रण ठेवणं कठीण झालं, दर्शनसाठी टोकन घेण्यावरुन चेंगराचेंगरी झाली आणि यातच 6 भाविकांनी आपला जीव गमवाला. तिरुपतीचं दर्शन घेण्याआधीच 6 भाविकांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. श्रीनिवासम, बैरागीपट्टेडा रामनायडू स्कूल आणि सत्यनारायणपुरम या तीन ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. श्रीनिवासमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेशुद्ध झाले तर जखमी भाविकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी दोघांची तब्येत खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना अनेक टोकन वाटप केंद्रांवर घडली, जिथं 10 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या भगवान व्यंकटेश्वराच्या वैकुंठ द्वारम दर्शनासाठी हजारो भाविकांनी आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी केली होती. काउंटर पहाटे 5 वाजता उघडणार होतं, तरीही भाविकांनी अदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली, त्यामुळे इथे प्रचंड गर्दी झाली.
दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिर संकुलात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, "मुख्यमंत्र्यांनी या घटनेत जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. मुख्यमंत्री वेळोवेळी जिल्हा आणि टीटीडी अधिकाऱ्यांशी बोलून सद्य परिस्थितीची माहिती घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.