उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे, असं सूचक विधान केलं आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधान करताना विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाक्षावर निशाणा साधला आहे. सध्या राज्यामध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करताना संजय राऊतांनी हे विधान केलं आहे.
महाराष्ट्राला मिळणार तिसरा उपमुख्यमंत्री
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला. "बाळासाहेबांची शिवसेना फोडून अमित शाहांनी समांतर शिवसेना तयार केली आहे. एकनाथ शिंदेंचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी स्वत:च्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा. काल ते मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. उद्या ते ही राहणार नाहीत, हे पण मी तुम्हाला सांगतो," असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना, "शिंदे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतोय आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे," असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या विधानाचा रोख शिंदेंच्या पक्षातील आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
राऊत आणि सामंतांमध्ये नेमका वाद काय?
काही दिवसांपासून राऊत आणि उदय सामंतांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 15 आमदार हे उदय सामंत यांच्या सोबत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. येत्या तीन महिन्यांत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 10 माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील होतील असा दावा उदय सामंतांनी परदेश दौऱ्यावर असताना केला. यावरुन संजय राऊत चांगलेच संतापले.
उदय सामंतांकडून खर्च वसूल करा
उद्योगमंत्री उदय सामंतांवर निशाणा साधताना संजय राऊत यांनी परदेशात बसून शिवसेनेत फूट पडणार असल्याचं विधान केल्यावर आक्षेप नोंदवला होता. "उद्योगमंत्री तिथे शिवसेनेचे किती लोक फुटणार यावर बोलत आहेत. मुख्यमंत्री यांनी सामंत यांना ताबडतोब मुंबईला पाठवलं पाहिजे. तुम्ही सरकारी खर्चाने तिथे गेले आहेत. मुख्यमंत्री यांनी उद्योगमंत्री यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे. परदेशातील परिषद ही राजकारण करण्याची जागा आहे का?" असा सवाल राऊथांनी विचारला होता.
शिंदे सुद्धा नकोसे होतील: राऊतांचं विधान
उदय सामंतांवर आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षावर निशाणा साधताना संजय राऊतांनी,"त्यांच्यावर मेरा बाप चोर हैं चा शिक्का आहे. आता संजय राऊत, आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना भेटले एवढंच सांगायचं बाकी आहे. यांनी आयुष्यभर फोडाफोडी केली. हे भटकाते आणि लटकते आत्मा आहेत. तुम्ही या राज्याची प्रतिमा सांभाळा. तुम्ही परदेशात बसून शिवसेना फुटणार हे सांगता, तुम्हाला लाज वाटतं नाही? आम्ही मरण पत्करू पण शरण जाणार नाही. उदय सामंत हे शिंदे यांचे आमदार फोडायला परदेशात गेले आहे हे मी पुन्हा सांगतो. एकनाथ शिंदे यांना कोणाचे आशीर्वाद आहेत? शिंदे हे फडणवीस यांना नकोसे झाले आहेत उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नकोसे होतील," असं म्हणालं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.