'मी बीडची मुलगी असल्याने...'; जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच महायुतीतील वाद उफाळून आला आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या गोंधळानंतर रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यावर बोलताना त्यांनी मला बीड जिल्ह्याची जबाबदारी मिळाली असती तर आनंद झाला असता, असं त्यांनी म्हटलं आहे. नागपूरातील एका कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्या बोलत होत्या. 'मला जालना येथील पालकमंत्री पद मिळालं. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव असं समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही. मी पूर्वी पाच वर्ष कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केलं,' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
'मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचा पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे. आत्ता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीला जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार. जालन्यासोबत डबल लक्ष मला द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहे ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे,' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. रायगडसह नाशिक जिल्हयाच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती रायगड आणि नाशिक जिल्हयाच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. निर्णयानंतर अवघ्या 24 तासात स्थगिती देण्याची वेळ
सरकारवर आली आहे. यामुळे महायुतीमधील बेबनाव समोर आलाय. रायगडच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली मात्र त्याविरोधात पालकमंत्री पदासाठी इच्छुक भरत गोगावले समर्थकांनी आंदोलन सुरू केलं. जिल्हयातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. गोगावलेंच्या समर्थनार्थ केवळ रायगडमधीलच नव्हे तर राज्यातील शिंदे गटाचे आमदार, मंत्री पुढे सरसावले. अखेर शिवसैनिकांच्या दबावामुळे सरकारला पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली. रायगडबरोबर नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.