Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- बड्या अधिकाऱ्याची 'लाचलुचपत'कडून चौकशी; भ्रष्टाचाराचे धागेदोरे उघडकीस!

पुणे :- बड्या अधिकाऱ्याची 'लाचलुचपत'कडून चौकशी; भ्रष्टाचाराचे धागेदोरे उघडकीस!
 

ठिबक अनुदानाचा घोटाळा दाबण्यासाठी झालेल्या लाचखोरी प्रकरणात कृषी आयुक्तालयातील एका बड्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत जातात, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे. फलोत्पादन संचालनालयातील फलोत्पादन कक्ष चारचे पूर्णवेळ उपसंचालक म्हणून संजय बहादू गुंजाळ कार्यरत होते. त्यांच्याकडे राज्याच्या फलोत्पादन विभागाच्या सहसंचालकपदाचादेखील अतिरिक्त कार्यभार होता. श्री. गुंजाळ यांना १० जानेवारीला पुण्याच्या संगमवाडी भागात पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना अटक केली आहे.

अमरावतीमधील कृषी विभागाच्या एका निलंबित लिपिकाकडे त्यांनी तीन लाख रुपये मागितले होते. तडजोडी करीत अडीच लाख रुपयांची लाच देण्यासाठी या लिपिकाला श्री. गुंजाळ यांनी पुण्यात बोलावले होते, असे लाचलुचपत विभागाचे म्हणणे आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे कृषी आयुक्तालय चांगलेच ढवळून निघाले आहे. या लाचखोर प्रकरणात श्री. गुंजाळ एकटे नसून त्यांना सूचना देणारा अधिकारी दुसराच असल्याचा संशय आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानेदेखील या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकशीचा भाग म्हणून कृषी आयुक्तालयातील एका बड्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बोलावण्यात आले. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याचा जबाब घेण्यात आला. तसेच, गुन्ह्याशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अद्याप कृषी आयुक्तालयाकडे अधिकृत माहिती मात्र अद्याप आलेली नाही.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत शेतकऱ्यांच्या नावाखाली लाखो रुपये बुलडाण्यात हडप करण्यात आले होते. त्या प्रकरणी गैरव्यवहारातील रकमांची वसुली आणि घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची जबाबदारी कृषी विभागाच्या अमरावती सहसंचालकाची होती. हा घोटाळा नेमका कोणी केला, घोटाळ्यात किती रक्कम हडप केली गेली तसेच केवळ एका लिपिकालाच निलंबित का केले गेले, याविषयी अमरावती सहसंचालक कार्यालयाने माहिती जाहीर केलेली नाही.
''मुळात, अमरावतीमध्ये हे प्रकरण घडत असताना त्यात पुण्यातून श्री. गुंजाळ यांनी हस्तक्षेप का केला, त्यांना या प्रकरणाची कागदपत्रे कोणी पुरवली, घोटाळेबाजांवर फौजदारी कारवाई टाळण्यासाठी त्यांना मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले,'' असे कळीचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी पथकाला दिलेल्या श्री. गुंजाळ यांनी दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणात आणखी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश होऊ शकतो,'' असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांनीच लावला सापळा
बुलडाण्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्यासाठी झालेल्या घोटाळ्याची मूळ चौकशी दाबण्यात आली आहे. या प्रकरणात केवळ एका लिपिकाला निलंबित करीत इतर अधिकाऱ्यांना मोकाट सोडले गेले. त्यात पुन्हा उपसंचालक संजय गुंजाळ यांनी पुण्याची हद्द सोडून अमरावतीच्या हद्दीत वसुलीचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिकारी नाराज होते. पुढची वसुली रोखण्यासाठी त्यांनीच या उपसंचालकासाठी सापळा लावला, अशी चर्चा आयुक्तालयात चालू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.