मुंबईतील दादर स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भर गर्दीत एका माथेफिरुन कॉलेजला जाणाऱ्या मुलीचे केस कापून पळ काढला. तरुणीचे केस कापण्याच्या या घटनेने घटनास्थळी खळबळ उडाली. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून यामागचं डोकं फिरवणारं कारण समोर आलं आहे.
दादर स्थानकावर एका माथेफिरुने कॉलेज जाणाऱ्या तरुणीचे केस कापले होते. त्यानंतर त्यांनी आरोपीचा पाठलाग केला मात्र गर्दीचा फायदा घेत आरोपी पळून गेले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरु केला होता. अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, जेणेकरून इतर मुलींना अडचणीचा सामना करावा लागू नये, अशी मागणी तक्रार करणाऱ्या मुलीने केली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन असं कृत्य करण्यामागचं कारण शोधून काढलं आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार तरुणी ही कल्याण येथील रहिवासी असून ती माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात शिकते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास तिनेकॉलेजला जाण्यासाठी कल्याणहून ट्रेन पकडली होती. ९.१५ च्या सुमारास ती दादर स्टेशनवर उतरली. दादर ब्रिजवरील तिकीट बुकींग खिडकीजवळ ती पोहोचली तेव्हा तिला अचानक तिच्या पाठीत काहीतरी टोचल्याचं जाणवलं. तिने अचानक मागे वळून पाहिले तर एक अनोळखी व्यक्ती बॅग घेऊन वेगाने चालत जाताना दिसली. तिने खाली पाहिले तर काही केस गळून पडलेले दिसले. त्यामुळे तिने केसांमधून हात फिरवताच तिचे केस अर्धे कापलेले दिसले. यामुळे ती घाबरली, पण तरीही तिने हिंमत एकवटून आरोपीचा पाठलाग सुरू केला. मात्र, गर्दीचा फायदा घेत तो लगेच तेथून पळून गेला आणि गायब झाला.आरोपीने सांगितले कारण
लांब केस आवडत नसल्याने दादर रेल्वे स्थानकावर तरुणीचे केस कापल्याची कबुली माथेफिरुने रेल्वे पोलिसांनी दिली आहे. आपल्याला तरुणी आणि महिलांचे लांब केस आवडत नसल्याने आपण ते कापले असं आरोपीने पोलिसांना सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.