तो दिवस होता 30 सप्टेंबर 1993, वेळ होती पहाटे 3.56 ची.भूकपांच्या धक्क्याने किल्लारी गाव उद्धवस्थ झाले होते. या घटनेनंतर सरकारने केलेली उपायोजना, राज्य सरकारचं काम, हे संकट कसं हाताळले याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात किल्लारी
भुंकपाच्या वेळेस त्यांनी घेतलेले निर्णयाची माहिती दिली. शरद पवार
म्हणाले, "देशामध्ये अनेक प्रकारची संकटे येतात. व्यक्तिशः
महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना मला तीन-चार वेळेला अशा
संकटांना तोंड देण्यासंबंधीचा प्रसंग आला. मला आठवतंय राज्याचा मुख्यमंत्री
होतो.
मुख्यमंत्री,
गृहमंत्री त्याच्या काही जबाबदाऱ्या असतात. मला आठवतंय की,
महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन हा अतिशय महत्त्वाचा आणि लोकांचा सहभाग
असलेला एक सोहळा असतो. त्याच्यामध्ये संघर्षही असतो, मंडळही असतात. माझा
गणपती पुढे? की तुमचा गणपती पुढे? माझं मंडळ महत्त्वाचं? की दुसऱ्याचं मंडळ
महत्त्वाचं? या गोष्टीत कुठे ना कुठेतरी राज्यामध्ये एक प्रकारची
संघर्षाची स्थिती असते. जो कोणी मुख्यमंत्री असतो किंवा गृह खात्याचा
मंत्री असतो किंवा तिथले वरिष्ठ अधिकारी असतात ते गणपती विसर्जनाचा जो दिवस
आहे त्याचा शेवटचा गणपती विसर्जित झाल्याशिवाय त्यांना झोपता येत नाही,"
"मला
आठवतंय की, त्या दिवशी मी महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हाधिकारी आणि एसपी
यांच्याशी सुसंवाद साधत होतो. माझ्या लक्षात आलं की, परभणीला गणपती
विसर्जनाला साडेतीन वाजले तरी अजून लोकांच्यात एकवाक्यता नाही. शेवटी मी
वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आणि तो शेवटचा गणपती परभणीला
विसर्जित झाला आणि मी झोपायला गेलो.
त्याच्या पंधरा-वीस मिनिटानंतर माझ्या निवासातील खोलीच्या खिडक्या हलल्या आणि खाली पडल्या. माझ्या लक्षात आलं की हे भूकंप असणार. लातूरला भूकंप झाल्याची माहिती मला मिळाली व पहाटे मी विमानाने लातूरला पोहोचलो आणि किल्लारी गावात गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक गावात भूकंपाचे संकट हे आलेलं आहे. शेजारी असलेल्या सोलापूरला मी माझं ऑफिस टाकलं आणि महाराष्ट्राच्या सबंध यंत्रणेला कामाला लावलं. देशातील जनतेला आवाहन केलं आणि सबंध जगातून व देशातून प्रचंड मदत त्या संकटग्रस्त लोकांना देशातल्या व देशाबाहेरच्या लोकांनी दिली," असे पवार म्हणाले.
साडेतीन वाजता मी किल्लारीतून जात होतो...
राज्याचे प्रशासकीय अधिकारी रात्रंदिवस काम करत होते. मला आठवतंय की, एक दिवशी असच तीन साडेतीन वाजता मी किल्लारीतून जात होतो. तिथे एक बैलगाडी होती आणि एक व्यक्ती झोपलेली होती. मला असं वाटलं ती कोणी जखमी आहे का? मी तिथे गेलो गाडी थांबवली आणि त्या झोपलेल्या व्यक्तीला झोपेतून उठवलं. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तो एकेकाळी किल्लारीचा लातूरचा जिल्हाधिकारी होता. या राज्याचा जिल्हाधिकारी दिवसभर संकटग्रस्तांना मदत करून शेवटी थकून एका बैलगाडीमध्ये पहाटे चार वाजता झोपतो. याचा अर्थ त्या संकटग्रस्तांमध्ये यंत्रणेची बांधिलकी किती आहे? याचा एक आदर्श उदाहरण मला पाहायला मिळाला.
लातूरचा प्रसंग हाताळला....
"आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून मदत केली, अधिकारी काम करत होते. असं संकट येतं त्यावेळी आपल्याकडे अनेक लोक परिस्थिती बघायला प्रचंड गर्दी ही त्या ठिकाणी करतात. मला त्यावेळचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांची सूचना आली की मी ही स्थिती बघायला लातूरला येतोय. मी त्यांना कळवलं तुम्ही अजिबात यायचं नाही. तुम्ही आलात तर माझी सगळी यंत्रणा प्रधानमंत्री यांच्या मागे लागेल, तुमच्या व्यवस्थेत लक्ष घालेल आणि हे महत्त्वाचं काम दुर्लक्षित होईल, तुम्ही येऊ नका. देशाच्या प्रधानमंत्री यांना एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री माझ्या राज्यात येऊ नका हे सांगतो. हे मी सांगितलं तर मला अभिमान आहे की, नरसिंहरावांनी त्याचं स्वागत केलं. या पद्धतीने आम्ही तो लातूरचा प्रसंग हाताळला," असे पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.