"मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी सुद्धा..."; बजरंग सोनवणे यांच्याविरोधात पोलिसाने केलेली 'ती' वादग्रस्त पोस्ट व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पहिल्यापासून चांगलंच उचलून धरलं आहे.
या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसंच त्यांना मदत करणाऱ्या नेत्यांसह पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय बीडमधील पोलिसांवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांश काणूनगो यांची भेट घेत या प्रकरणात मानव अधिकार आयोगाने स्वतंत्र तपास करावा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडेंसह दहिफळे या दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी त्यांनी केली होती. तर सोनवणे यांनी ज्या पोलिसाचं कॉल
रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. त्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे
यांनी बीडमधील पोलिसांच्या ग्रुपवर खासदार सोनवणे यांच्या संदर्भात
व्हाट्सअॅप ग्रुपवर एक वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टमुळे आता नव्या
वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गणेश मुंडेंची नेमकी पोस्ट काय?
गणेश मुंडे यांनी 'बीड पोलिस प्रेस' या व्हाट्सअॅप ग्रुपवर शनिवारी (4 जानेवारी) रोजी सायंकाळी एक मेसेज केला. त्यामध्ये त्यांनी लिहिलं, "या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर..." या पोस्टनंतर खासदार कोण? असं ग्रुपमधील काही पत्रकारांनी ग्रुपवर विचारलं. मात्र, त्यांनी नाव सांगण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी मुंडेंना सदर ग्रुपमधून काढून टाकलं.त्यांनी कोणाचे नाव घेतलं नसलं तरीही या पोस्टचा संदर्भ दोन दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला दिलेल्या पत्राशी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता पोलिस एका लोकप्रतिनिधी संबंधित अशी धमकीवजा पोस्ट करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल बीडसह राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.