कोल्हापूरच्या शाळेत आला सिंघम ! माजी विद्यार्थ्यांनी शाळेत बनवलं वादग्रस्त रील; मुख्याध्यापक आले अडचणीत
कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांनी सिंघम चित्रपटातील एका सीनवर रील बनवून व्हायरल केल्याने शाळेचे मुख्याध्यापक चांगलेच अडचणीत आलेले आहेत.
हा रील संपूर्ण जिल्हाभर व्हायरल झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेतील काही माजी विद्यार्थी शाळेला भेट देण्याच्या बाहण्याने शाळेच्या परिसरात दाखल झाले होते. त्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्याकडे शाळेमध्ये फोटो काढण्याची परवानगी मागितली. मुख्याध्यापकांनीदेखील आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, म्हणून त्यांनी केवळ फोटो काढण्याची परवानगी दिली. मात्र या परवानगीचा गैरवापर करत या माजी विद्यार्थ्यांनी थेट सिंघम चित्रपटातील वाक्य असणारा रीलस शूट केला.
सिंघम आणि जयकांत शिखरेची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कलाकारांनी शाळेच्या आवारातच ही दृश्य चित्रित करून शाळेच्या टेबल खुर्च्यांवर लाथादेखील मारल्या. हा रील जेव्हा प्रसारित झाला, त्यावेळी मात्र गावकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली. काहींनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली. यासंदर्भात बोलताना, माजी विद्यार्थ्यांनी शाळेत केवळ फोटो काढण्याच्या बहाण्याने परवानगी मागितल्यामुळेच आपण त्यांना परवानगी दिली, मात्र त्याचा त्यांनी गैरवापर केल्याचं मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं आहे.यासंदर्भात शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी प्रतिक्रिया दिली. तरुणांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर रील करण्याचं फ्याड निर्माण झालंय. सोशल माध्यमांमध्ये काहीतरी वेगळं करत असल्याचे दाखवत अनेक तरुण अशा पद्धतीचे रिल्स करत असतात. मात्र कोणता विषय घेऊन कोणत्या ठिकाणी रील करावं याचं भान तरुणांना असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच ज्या मुख्याध्यापकांनी या तरुणांना शाळेत रील शूट करण्याची परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असे त्या म्हणाल्या.एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले जात असताना दुसरीकडे शाळेचा वापर रीलसाठी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या माजी विद्यार्थ्यांनी रील बनवत असताना त्यांना विषयाचा आणि ठिकाणाचं जरी भान नसलं तरी त्यांनी सामाजिक भान ठेवणं तितकच गरजेचं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा विविध चित्रपट, लघुपट आणि चांगल्या गोष्टींसाठी वापरायला परवानगी दिली जाते. मात्र प्रशासनाला अंधारात ठेवून अशा पद्धतीचे काही चित्रित होत असेल तर त्यांच्यावर नियंत्रण आणणे तितकच गरजेचं आहे. आता या माझी विद्यार्थी रीलस्टारवर जिल्हा परिषद काय कारवाई करतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.