राजकारणात एकाला पायाखाली तुडवूनच दुसऱ्याला पुढे जावं लागतं. इथे गुरु, मित्र, सहकारी, भाऊ, बहीण अशी कुठलीही नाती नाहीत, आहे ती फक्त स्पर्धा आणि सत्तेची महत्वाकांक्षा. मागच्या काही वर्षांचं महाराष्ट्रातलं राजकारण तरी हेच सांगत आहे. सोमवारी उदय सामंत यांचं नाव दिवसभर चर्चिलं जात होतं. त्यामागचमी कारणंही आहेत. त्याआधी सामंताचं राजकारण समजून घेणं महत्वाचं आहे. उदय सामंत हे सुरुवातीला राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष होते. मग पुढे
ते आमदार झाले. पुढे शिवसेनेत प्रवेश. तिथेही आमदार आणि आता शिंदेंच्या
शिवसेनेतही आमदार. २००४पासून मोजलं तर आता ५वी टर्म. सामंतांनी विविध
खात्याची जबाबदारी संभाळली आहे, ते म्हाडाचे अध्यक्षही होते. त्यांची
खासियत म्हणजे ते ज्या पक्षात असतात तिथल्या वरिष्ठांच्या जवळ असतात. कायम
निकटवर्तीयांमध्ये त्यांचं नाव असतं अर्थात या किमयेमागचं गमकही सामंतच
सांगू शकतील. सुरुवातीला ठाकरेंना सोडणार नाही म्हणणाऱ्या सामंतांना
गुवाहाटीला बघून सगळेच अवाक झाले होते.
तर आता हेच सामंत शिंदेंच्या विरोधात २० आमदारांची मोट बांधून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते असे विविध आरोप आज विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत यांनी केले. अर्थात उद्योगमंत्री सामंतांनी त्यात काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आणि शिंदेंमध्ये आणि माझ्या भांडण लावत आहेत वगैरेही म्हटलं पण मग सामंतांचंच नाव का ? भुसे का नाहीत ? गुलाबराव पाटील का नाहीत किंवा कोकणातले गोगावले का नाहीत ? सामंतांचं नाव का घेतलं हेही समजून घ्यायला हवं. उदय सामंत हे राष्ट्रवादी, शिवसेना अखंड आणि मग शिंदे असा प्रवास करून आलेत. राजकारणात पुढे जायचं असेल तर वेळप्रसंगी रिस्क घ्यायची तयारी लागते हे त्यांना पुरेपूर माहितीये आणि म्हणूनच त्यांचं नाव घेतलं गेलंयं
महायुती सरकारला बहुमत मिळाल्यावर प्रत्यक्ष सत्तास्थापनेला बराच वेळ लागला. लपवण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेंची नाराजी, पडलेला चेहरा बरंच काही सांगत होता. फडणवीसांचं गृह आणि दादांचं अर्थ सोडलं तर खातेवाटपात पुनः एकदा उद्योग खातं मिळालेले सामंत एकटेच आहेत. एकीकडे शिंदेंची नाराजी मिटण्याची चिन्ह दिसत नसताना भाजपने प्लॅन बी म्हणून सामंत तयार ठेवले का असाही आरोप विरोधकांनी केलाय. त्यातच २० आमदारांचा गट वगैरे सांगून राऊतांनी अजून तेल ओतलंय. ऍक्टिव्ह राजकारणात २५ वर्ष काढणाऱ्या सामंतांनी यावर लगेच स्पष्टीकरण दिलं खरं पण चर्चा थांबण्यास तयार नाहीत.
नीट बघितलं तर एक सामंत सोडले तर शिंदेंच्या शिवसेनेत राजकीय दृष्ट्या स्मार्ट चेहरा दुसरा नाही. बरेचसे नेते हे ग्रामीण भागातून येतात. शहरी हुशारी आणि ग्रामीण नाळ याचा त्यांच्याकडे संगम नाही. त्यातच कोकणात जम असलेला, तरुण आणि स्मार्ट चेहरा म्हणून सामंतांचा पर्याय असू शकतो. ते मध्यंतरी जवळपास दररोज पत्रकार परिषदा घेत होते. असा सलग माध्यमसंवाद त्यांनी पूर्वी केला नव्हता हेही लक्षात घ्या.भाजपचं आणि सामंतांचे चांगले संबंध असल्याचीही चर्चा आहे. विशेषतः उद्योग मंत्री असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही त्यांची वैयक्तिक जवळीक असल्याचं बोललं जातं. फडणवीसही त्यांच्यावर खुश असतात. आगामी काळात महायुती सरकारने अनेक ड्रीम प्रोजेक्ट कोकणात आहेत. सिंधुदुर्गात राणे बंधू आणि रत्नागिरीत सामंत बंधू मिळाल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. राजकारणात पतंगबाजी चालते हे जरी खरं असलं तरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही हेही विसरून चालणार नाही.
शिंदे एकीकडे पालकमंत्री पदांसाठी फडणवीसांवर दबावतंत्र वापरत असताना तिकडे त्यांच्याच पक्षात आव्हान निर्माण होत असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात महायुतीला भरभक्कम बहुमत मिळाल्यावर राजकारण स्थिर होईल असा अंदाज असताना पडद्यामागे घडामोडी घडायला सुरुवात झालीये आणि म्हणून सामंतांची बातमी चर्चेत आहे हेच खरं
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.