Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाल्मिक कराडप्रकरणावरून केंद्रीय मंत्र्याचा फडणवीसांना घरचा आहेर; म्हणाले... 'एवढा वेळ'


वाल्मिक कराडप्रकरणावरून केंद्रीय मंत्र्याचा फडणवीसांना घरचा आहेर; म्हणाले... 'एवढा वेळ'

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय गाजत आहे. आज (ता.१) याप्रकरणावरून थेट भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे.

वाल्मिक कराड प्रकरणावरून पोलिसांच्या कारवाईवर बोट ठेवत केंद्रीय मंत्र्यांनी कारवाईसाठी एवढा वेळ लागायला नको होता, असे म्हटले आहे. यामुळे आता भाजपचे मित्र पक्षाचे प्रमुख नेते तथा केंद्रीय मंत्रीच पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय आता राज्याच्या पटलावर महत्वाचा बनला आहे. मागील काही दिवसापासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले आहे. तर देशमुख यांच्या कुटुंबियांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले  कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते.

यावेळी त्यांनी, बीड येथील संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. माणुसकीला कलंक लावणारी ही घटना असून आम्ही देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणातील वाल्मिक कराड तब्बल २० दिवस फरार होता. तो स्वतः हून २१ व्या दिवशी पोलिसांसमोर हजर झाला. मात्र तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन अटक करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी कठोर कलम लावावीत, जी सर्वांचीच मागणी आहे. सध्या वाल्मिक १४ दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.

टोळ्यांवर कडक कारवाईची गरज

बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य करताना आठवले म्हणाले, जिल्ह्यात गुंडागर्दी करणारी, खंडणी मागणारी सक्रीय असल्याच्या चर्चा आहेत. अशा टोळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड सारख्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. फक्त कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तर मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड मित्र असून यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रश्नावर आठवले यांनी, मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे म्हटले असून त्यांच्या या प्रकरणाशी काही संबध नसल्याचा दावा केला आहे. तसेच जर वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात हात असल्यास कारवाई करावी, अशीही भूमिका धनंजय मुंडे यांनी मागणी केल्याचे आठवले म्हणाले.

मंत्रीपदाबाबतची खंत

यावेळी रामदास आठवले यांनी, पुन्हा एकदा मनातील मंत्रीपदाबाबतची खंत व्यक्त केली. तसेच जे एक मंत्रीपद शिल्लक आहे ते आरपीआयला देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी येणाऱ्या महापालिका आणि इतर निवडणूकांमध्ये आरपीआयला जागा देण्यासह एक महापौर पद देण्यात यावे अशीही मागणी केली आहे.

आर्थिक मदत आणि नोकरी द्या

परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिस लॉक अपमध्ये मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी विनंती गृह खात्याला त्यांनी केली आहे. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्यासह त्यांच्या भावाला नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तर ज्यांना संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नसल्याचेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.