परळी पोलिस ठाण्यात गेल्या १५ वर्षांपासून एकाच जागी नोकरीस असलेल्या पोलिस हेड काँन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्यावर भाजपचे आ. सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले. केंद्रे यांच्याकडे १५ जेसीबी व १०० राखेचे डिप्पर असून तेथील स्थानिक मटका बुकीसोबत त्यांची पार्टनरशिप आहे, असा आरोप आ.धस यांनी केला होता. आता धस यांच्या याच आरोपानंतर केंद्रे यांनी थेट वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क करत, त्यांचे मार्गदर्शन मागितले आहे. या प्रकारामुळे हा वाद आता वाढणार असल्याचे दिसत आहे.
काय होते धसांचे आरोप?
आ. सुरेश धस यांनी काल पोलिस हेड काँन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्यावर आरोप केले होते. परळी पोलिस दलातील केंद्रे हे गेल्या १५ वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात आहेत. त्यांचे १५ जेसीबी व १०० राखेचे डिप्पर आहेत. तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची अर्धी पार्टनरशिप आहे, असा आरोप धस यांनी केला होता. शिवाय मीडियाने मी जे बोलतोय ते परळीत जाऊन चेक करावं, असं आव्हानही धस यांनी दिलं होतं.
काय म्हणतोय पोलिस?
या प्रकारानंतर पोलिस हेड काँन्स्टेबल भास्कर केंद्रे यांनी फिर्याद देण्याऐवजी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क साधला. या दोघांमध्ये झालेल्या फोनची ऑडीयो क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यात सदावर्ते केंद्रे यांना कसले टिप्पर आहेत, असा प्रश्न विचारतात. त्यावर केंद्रे म्हणतात, साहेब टिप्पर सोडा. माझ्याकडे साधा टायरही नाही. मीच काय पण माझे भाऊ, चुलतभाऊ, नातेवाईक, मित्र यांच्याकडेही टिप्पर नाही. जर सापडला तर मी एका मिनिटांत राजीनामा देईल. तुम्ही कुणालाही माझ्या गावात पाठवा. जर कुणी म्हणाला माझ्याकडे ही संपत्ती आहे, तरी मी राजीनामा देईल, असं या फोनमध्ये केंद्रे म्हणत आहेत.
धसांवर केला आरोप
याच फोन काँलमध्ये सदावर्ते हे केंद्रे यांना आरोप कशामुळे होतात हे विचारतात. त्यावर केंद्रे म्हणतात, "सुरेश धस हे राष्ट्रवादीत मंत्री असताना आम्ही काही कारवाई केलेल्या होत्या. त्यामुळे पूर्ववैमन्यसातून ते हे बोलत असावेत. मी आता बाहेर आहे. पण मी याबद्दल कायदेशीर पावलं उचलणार आहे. माझ्या कुटुंबाचे, माझ्या मुलीचे फोटोही व्हायरल करण्यात आले. माझी बदनामी झालीय. पोलीस खात्यात काम करत असताना माझा रेकॉर्ड तुम्ही पाहा. पोलीस महासंचालकांनी माझा सन्मान केला आहे.", असेही भास्कर केंद्रेंनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.