चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
नागपूर : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या अवयवांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू H5N1 मुळे म्हणजे बर्ड फ्लूमुळे झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. आता वाघ आणि बिबट्याला नेमकं बर्ड फ्लू कसा झाला? याबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
गणेश नाईक यांनी म्हटले आहे की, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांना चंद्रपूरला बोलावले आहे. कोंबडीच्या मटणातून त्यांना ही लागण झाली अशी प्राथमिक माहिती आहे. याची सत्यता तपासली जाईल. खाद्य तपासून द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणीसंग्रहालयाला दिलेल्या आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.नेमकं प्रकरण काय?
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघांना उपचारासाठी आणण्यात आले होते. हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. या चौघांचा मृत्यू कसा झाला याचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या अवयवांचे नमुने भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. हा अहवाल समोर आला आहे. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानंतर इतर प्राण्यांना लागण होऊ नये, त्यासाठी प्राण्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण झाली की नाही? यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. H5N1 मुळे वाघाच्या मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.