संभाजीनगर: संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये एका गर्भवती महिलेची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या पोटावर बसून मारहाण केली. या मारहाणीत गर्भवती महिलेचा जागीच
मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर सासरच्या
मंडळींनी पीडित महिलेनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र शवविच्छेदन
अहवालातून या बनावाचं बिंग फुटलं आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं
शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.
मनिषा सतीश सपकाळ असं हत्या झालेल्या ३४
वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर सतीश लक्ष्मण सपकाळ (पती), लक्ष्मण
कडुबा सपकाळ (सासरा) आणि लीलाबाई लक्ष्मण सपकाळ असं आरोपींची नावं आहेत.
सर्व आरोपी सिल्लोड शहरातील शास्त्री कॉलनीत राहतात. मृत महिलेचे वडील खंडू
किसन शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड पोलिसांनी आरोपींविरोधात
गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या
घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मृत मनिषा आणि आरोपी पती सतीश यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मनिषा यांना मूलबाळ होत नव्हतं. यावरून सासरच्या मंडळींकडून मनिषाचा छळ केला जात होता. शिवाय पैशांची मागणी केली जात होती. पण मुलगी त्यांचा त्रास सहन करीत होती. गुरुवारी रात्री मला मुलीचे सासरे लक्ष्मण सपकाळ यांनी फोन केला. तुमच्या मुलीने फाशी घेतली, असे सांगत त्यांनी फोन कट केला. आम्ही तातडीने सिल्लोड गाठून उपजिल्हा रुग्णालयात गेलो. तिथे मुलगी मृत अवस्थेत होती. माझ्या मुलीला पती, सासरा आणि सासू यांनी गर्भवती असताना पोटावर बसून जबर मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला, असं वडिलांनी तक्रारीत म्हटलं. पीडितेचं शवविच्छेदन केलं असता मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तर उपनिरीक्षक मनीष जाधव, पोलिस कर्मचारी सुनील तळेकर आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. पती, सासऱ्याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीष जाधव करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.