अन्न हे पूर्णब्रह्म.. असं खरंतर आपल्याकडे म्हटलं जातं आणि ते मानलंही जातं. कोणताही पदार्थ असो, मग तो आपल्याला आवडो किंवा न आवडो, तो पानात वाढला असेल तर तो संपवायलाच पाहिजे, असं आपले आई-वडील लहानपणापासून सांगत असतात. पण सध्याच्या जगात एकेक नवे ट्रेंड निघत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जगातील सर्वात चांगल्या आणि वाईट पदार्थांची नावं जाहीर करणं. त्याने काय मिळतं काय माहीत ? पण अशीच एक यादी जाहीर झाली आहे, त्यामुळे आता नवा वाद पेटू शकतो हे नक्की…
अत्यंत पोषक आणि तितकाच चविष्ट असलेल्या एका पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थाचा जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या पदार्थाला सर्वात वाईट पदार्थाच्या यादीत स्थआन देण्यात आले आहे, ती भारतीय डिश देशभरातील विविध भागांत चवीने खाल्ली जाते.
असा कोणता पदार्थ आहे तो ?
खरंतर भारतातील मिस्सी रोटी या पदार्थाला जगातील सर्वात वाईट पदार्थांमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे बरेच नेटीझन्स संतापले आहेत. मिस्सी रोटी ही अतिशय पौष्टिक आणि सुपरफूड मानली जाते. मात्र टेस्ट ॲटलसने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड्स वर्स्ट डिशेस’च्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
टेस्ट ॲटलसची यादी जाहीर
जानेवारी (2025) मध्ये ही यादी जाहीर झाली असून त्यामध्ये सर्वात वाईट डिशेसमध्ये 100 पदार्थांच्या यादीत मिस्सी रोटी 56 व्या स्थानी आहे. या यादीत भारतातील ही एकमेव डिश आहे. पण त्यामुळे नेटकरी मात्र प्रचंड भडकले असून कमेंट्सद्वारे त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत.
मिस्सी रोटी म्हणजे काय ?
पंजाबमधीस प्रसिद्ध पदार्थ असलेली ही मिस्सी रोटी खरंतर बेसन, मसाले आणि भाज्यांपासून बनवली जाते. ती ग्लूटेन-फ्री असता आणि बरेच लोक ती आवडीने,खूप चवीने खात असतात. ही डिश अतिशय पोषक आणि आरोग्यदायी असते असे मानले जाते.
काय आहे वाद ?
या यादीत मिस्सी रोटी सोबत जेली इल्स, फ्रॉग आय सॅलड, डेव्हिल्ड किडनी आणि ब्लड डंपलिंग्ज सारख्या विचित्र पदार्थांचा समावेश होता. यावर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मिस्सी रोटीचा जगातील सर्वात वाईट पदार्थांमध्ये समावेश करण्यात आलाय असं Reddit वरील एका पोस्टमध्ये लिहीण्यात आलं आहे. मात्र आपण याचा विरोध केला पाहिजे. प्रत्येक भारतीय पदार्थ हा काही मास्टरपीस नसतो, असं त्यांना दाखवायचं आहे म्हणूच त्यांनी मिस्सी रोटीचा या यादीत समावेश केलाय, असं अन्य एका यूजरने लिहीलं आहे.
सोशल मीडियावर विरोध
सोशल मीडियावर लोकांनी Taste Atlasच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले. प्रत्येकाची चव वेगळी असते,पण वाईट पदार्थांच्या यादीत मिस्सी रोटीचा समावेश करणं हे तर चुकीच आहे, असं यूजर्सचं म्हणणं आहे. त्यांना जर एखाद्या पदार्थाचा समावेश करायचाच होता तर ते वांग्याची किंवा कारल्याची भाजी निवडू शकले असते, असेही काहींनी म्हटलं. एकंदरच वाईट पदार्थांच्या यादीत मिस्सी रोटीचा समावेश केल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.