Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा
 

महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्री पदावरूनही प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरुन वादाची ठिणगी पडल्याचे म्हटलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरे गावी गेल्याचे म्हटलं जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली असून नवीन उदय पुढे येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

 
पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाने दावा केला होता. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीष महाजन यांच्या नावाला अजित पवार गटाने विरोध केला होता. त्यानंतर रविवारी महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

"ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थिगिती देईल असं मला वाटायला लागलय. बहुमत मिळालं तरी ही काय सरकार चालवायची पद्धत आहे. आपआपसातले मतभेद वाढले आहेत. केवळ सत्तेसाठी ही स्पर्धा सुरु आहे. भांडा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करा असं म्हणायची वेळ आली आहे. आता पालकमंत्री बदलले आहेत शेवटी मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावी गेल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावरही वडेट्टीवारांनी भाष्य केलं. "नाराज होऊन पदरात पाडता येईल असा विषय आता फक्त बाकी आहे. एकनाथ शिंदेची परिस्थिती बिकट आहे. एकनाथ शिंदेंची गरज संपली का? कदाचित एकनाथ शिदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा स्थिती येईल. शिवसेनेचा तिसरा उदय दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण उदय दोन्ही बाजूवर हात ठेवून आहेत. त्यांनी संबंध इतके सुंदर करुन ठेवले आहेत की ते उदयासाठीच आहेत," असा टोलाही विजय वडेट्टीवारांनी लगावला.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.