मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पुणे शहरात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी केलेल्या भाषणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी
धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि नंतर
निवडणुकीसाठी या कंपनीकडून ५० लाख रुपये घेण्यात आले, असा आरोप सुरेश धस
यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंवर आरोप करताना तारखांचा उल्लेख करत सुरेश धस म्हणाले की, "१४ जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब वाल्मीक कराडला खटकली. त्यामुळे वाल्मीकने जोशीला खडसावलं आणि त्यानंतर १९ जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली. वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमत दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच ५० लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना ५० लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मीक कराड याने हे मला माहीत नाही. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या," असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
"...तर मी राजकारण सोडतो"
"अजितदादा मी तुमच्या पाया पडतो, तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंकडे? त्यांना जाऊ द्या मंत्रिमंडळातून बाहेर. ते सातपुडा या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका घेत आहेत. ही माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता ३०० गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो १००० गायींचा गोठा करेन. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना विनंती आहे की,या गोष्टीचा छडा लावा आणि प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा," असं आवाहनही सुरेश धस यांनी केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.