मुंबई : सधाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाबाबत धुसपूस सुरू आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकही आक्रमक झाले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवा उदय होत आहे, असे सूचक विधान केले होते. या सध्याच्या सर्व घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. सोमवारी (20 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नव्हते, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशात जाण्याआधी पालकमंत्रिपदाबाबतची घोषणा केली. पण त्यांच्यातच धुसपूस सुरू झाली. एका मंत्र्याने रायगडमध्ये रास्तारोको केला, धमक्या दिल्या. हे सर्व प्रकार म्हणजे जनतेने दिलेल्या बहुमताचा तुम्ही अनादर करत आहात," अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
"आमचे एक उपमुख्यमंत्री असून ठाण्याचे त्यांना राग येतो. त्यांना राग आला की ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दुपारी जातात, दिवसा जातात. त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचे मग?" असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. "एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी नागा साधूंबरोबर महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होते. नागा साधूही अस्वस्थ असतात. अघोरी विद्या करतात, नाचतात आपल्या तंबूत बसतात. जे अस्वस्थ असून महाराष्ट्रात आहेत त्यांच्यासाठी योगी आदित्यराज यांनी प्रयागराजमध्ये काही तंबू आणि साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आहात तर महाराष्ट्राला का त्रास देता? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर, लोकांच्या मुळावर येत आहे. जितके दिवस कुंभ, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी." असा खोचक टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, 'उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणले, शिंदेंना संपवून आता नवीन उदय होत आहे,' असे सूचक विधान केले. यावरून संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, ते म्हणाले की, "काँग्रेस सांगते उद्धव ठाकरे संपले, पण उद्धव ठाकरे हे संपलेले नाहीत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनादेखील संपवण्याच्या वल्गना त्यावेळी करण्यात आल्या होत्या. पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करत आहेत. पण तुम्ही कुठे आहात?" असा सवाल त्यांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना केला. शिवसेना संपली नाही, आणि शिवसेना संपणार नाही. पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच आम्ही उभारी घेऊ." असा विश्वास त्यांनी दर्शवला. तसेच, "एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही तेच होणार, जे त्यांनी शिवसेनेसोबत केले. भाजप कोणालाही सोडत नाही," असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.