'पहिल्यांदा समज द्या नाही ऐकलं तर स्पीकर जप्त करा', मशिदींवरील भोंग्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई : मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल दिला आहे. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी, असं न्यायालयाने म्हटले आहे. पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करावा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला
होता, अखेर उच्च न्यायालयाने देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रात आजानचा आणि भोंग्याचा मुद्दा हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी
उचलून धरला होता.
तसेच त्यांनी मशीदीवरील भोंगे उतरवा असे देखील म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. डेसीबल पातळीचे उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेबाबत विश्राम बेडेकर यांची तक्रार होती. मशिदीच्या लाऊड स्पीकरवरून होणारे डेसिबलचं उल्लंघन याचा याचिकेत स्पष्ट उल्लेख होता. यामुळे याबाबत महत्त्वाची मार्गदर्शकतत्वे उच्च न्यायालयाने घालून दिली आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले, राज्यामध्ये हिंदूत्त्ववादी विचाराचे सरकार आहे. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून अनेक हिंदूत्त्ववादी संघटनांच्या तक्रारी येत असतात. न्यायालयाच्या निकालावर 100 टक्के अंमलबजावणी करण्याचे काम आमच्या सरकारचे आहे. कायदा हा सर्वांसाठी आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे कोणीही अवमान करेल त्याला कठोर शिक्षा देण्याची भुमिका आमचे सरकार घेईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : संदिप देशपांडे
मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.हा काही पहिल्यांदा कोर्टाचा निर्णय आलेला नाही. यासंदर्भात या अगोदर देखील कोर्टाने आदेश दिले आहेत. शासनाने कोर्टाच्या ज्या नव्या गाईडलाईन्स आल्या आहेत त्याचे पालन केले पाहिजे. शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. या निर्णयानंतर राज ठाकरे जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करणार आहे.
मशिदीवरील भोंगे हा नेहमीच वादग्रस्त विषय
ध्वनी प्रदूषण फक्त भोंग्याच्या आवाजानेच होत नाही तर ती होण्याची विविध कारणे आहेत. मुंबई उच्च न्यायालय तसेच देशातील अन्य न्यायालयाकडून ध्वनी प्रदूषणाबाबत याआधी अनेक कडक निर्णय देण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये सर्व प्रार्थनास्थळे यांच्याकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मशिदीवरील भोंगे हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.