बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. ९ डिसेंबर रोजी इथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीडमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हे
घडताना दिसत आहेत. संतोष देशमुख प्रकरणी पोलिसांनी कुचराई केल्यामुळे बीड
पोलीस प्रशासनही चांगलंच चर्चेत आहे. येथील काही पोलिसांचे थेट मुख्य आरोपी
वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याचं समोर आलं आहे.
या सगळ्या घडामोडी ताज्या असताना आता
बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे पोलीस अधीक्षकांच्या
कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
आहे. अनंत इंगळे असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज पहाटे त्यांनी
पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर असताना टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती
समोर आली आहे.
इंगळे यांनी अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट का केला? त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय? याची माहिती अद्याप समोर आली नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं बीडच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना कसला तणाव होता का? यामागचं कारण समजू शकतं. या आत्महत्येशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह उतरवला जाईल, पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.