'अपत्य नसलेल्या महिलांना गरोदर करा आणि पाच लाख रुपये मिळवा' अशा वेगळ्या नोकरीबद्दल अनेक तरुणांमध्ये आकर्षण होतं. त्यातच पैसेही भरपूर मिळणार असल्यामुळे त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर अनेकांनी संपर्क साधला; पण जे घडलं त्यानंतर अनेकांनी पोलिसांत तक्रारी नोंदवल्या.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून, टोळीतील आणखी लोकांचा शोध सुरू आहे. बिहारमधल्या नवादा इथं गेल्या काही दिवसांपासून विचित्र नोकरीच्या जाहिराती झळकत होत्या. ज्या महिलांना अपत्य नाही, त्यांना गरोदर करण्यासाठी तरुणांना पाच लाख रुपयांची ऑफर त्या नोकरीत दिली होती. इतकंच नाही, तर महिलेला दिवस गेले नाहीत, तरीही त्या तरुणाला किमान 50 हजार रुपये तरी मिळणार होते. अशी आकर्षक कमाईची संधी मिळवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर नोंदणी केली; मात्र नोंदणीच्या नावाखाली लोकांकडून भरपूर पैसे घेतले गेले आणि त्यानंतर त्यांचा मोबाइल ब्लॉक करण्यात आला. असे अनुभव अनेकांना आल्यावर पोलिसांत तक्रारी नोंदवल्या गेल्या.
या संदर्भात कारवाई करून नवादा पोलिसांनी नारदीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कहुआरा गावात छापेमारी करून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब (बेबी बर्थ सर्व्हिस), प्ले बॉय सर्व्हिस अशा नावांखाली ते लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. आरोपींनी किती लोकांना फसवलं आहे आणि त्यांच्याकडून किती पैसे लुबाडले आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.हे सायबर गुन्हेगार लोकांना देशाच्या विविध राज्यांमधून फोन करायचे आणि त्यांना नोकरीची ऑफर द्यायचे. महिलांना गरोदर करण्यासाठी पाच लाख रुपये मिळतील असं आमिष दाखवायचे. अशा लोकांकडून नोंदणी करून घेण्यासाठी पाचशे ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम ऑनलाइन पद्धतीनं घ्यायचे. पैसे आले की त्यांचा फोन नंबर ब्लॉक करायचे. अशा पद्धतीनं त्यांनी अनेकांकडून नोंदणी फी म्हणून पैसे लुटले आहेत.पोलिसांना त्यांच्याकडे सहा अँड्रॉइड मोबाइल सापडले आहेत. मोबाइलमध्ये व्यवहारांबाबतचे व्हॉट्सअॅप फोटो, ऑडिओ आणि प्रत्यक्ष व्यवहाराची माहितीही मिळाली आहे. राहुल कुमार (19), भोला कुमार (20) आणि प्रिन्स राज उर्फ पंकज कुमार (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. नारदीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कहुआरा गावातील ते रहिवासी आहेत. या तिघांव्यतिरिक्त त्यांच्या टोळीतल्या सर्व जणांचा शोध पोलीस घेत आहेत, असं पोलीस उपअधीक्षकांनी सांगितलं आहे. नोकरीचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे लुबाडणाऱ्या अशा सायबर चोरांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पोलीसही वेळोवेळी सतर्क राहण्याच्या सूचना करत असतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.