किल्लेमच्छिन्द्रगड येथील एका साखर कारखान्याच्या वाहन तळावरून ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ट्रॅक्टर तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा 3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
शंकर ज्ञानेश्वर ठाकरे (वय 35, रा. वेणीकुटा, यवतमाळ, मूळ रा. अमरावती), लहू मधुकर उगलमुगले (वय 41, रा. केज, बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किल्लेमच्छिन्द्रगड येथील एका साखर कारखान्याच्या वाहन तळावरून ट्रॅक्टर चोरीला गेला होता. त्यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिल्या होत्या. निरीक्षक हारूगडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्याना पकडण्यासाठी शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पथक चोरट्याचा शोध घेत असताना तुजारपूर फाटा येथे एकजण जुना ट्रॅक्टर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन ट्रॅक्टर अडवला. त्यामागून येणारी बोलेरो जीपही अडवली. ट्रॅक्टर चालकाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने किल्लेमच्छिन्द्रगड येथील साखर कारखान्याच्या वाहन तळावरून ट्रॅक्टर (एमएच 44 डी 503) चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यासाठी बोलेरो जीप (एमएच 11 एके 3523) वापरल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे, उगलमुगले यांना अटक करून दोन्ही वाहने जप्त केली. पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने शिवाजी यादव, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दिपक गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.