Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया गर्लफ्रेंडसोबत गोव्याच्या समुद्रात बुडता बुडता वाचला; IPS अधिकाऱ्याने वाचवले प्राण

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया गर्लफ्रेंडसोबत गोव्याच्या समुद्रात बुडता बुडता वाचला; IPS अधिकाऱ्याने वाचवले प्राण
 

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे. त्याचे पॉडकास्ट तुफान व्हायरल होतात आणि त्याला नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रणवीर नुकताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोव्याला फिरायला गेला. मात्र गोव्याच्या समुद्रात पोहताना रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव धोक्यात आला होता. त्याने खुद्द इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित घडलेली थरारक घटना सांगितली. एका IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला बुडण्यापासून वाचवलं.

 रणवीरची पोस्ट-

गोवा ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत रणवीरने लिहिलं, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वांत इव्हेंटफुल ख्रिसमस होता. आता आम्ही एकदम ठीक आहोत. मात्र काल संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मी आणि माझी गर्लफ्रेंड एका विचित्र घटनेतून वाचलो. आम्हा दोघांनाही खुल्या समुद्रात पोहायला खूप आवडतं. मला लहानपणापासून समुद्रात पोहोण्याचा अनुभव आहे. मात्र काल पोहताना आम्ही अचानक पाण्याखालील प्रवाहामुळे बुडू लागलो. माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं. अशा घटनेत एकट्याने पोहत बाहेर येणं सोपं असतं. पण स्वतःसोबत दुसऱ्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढणं खूप कठीण होतं. 

पाच-दहा मिनिटं प्रयत्न केल्यानंतर आम्ही मदतीसाठी हाक मारली. तेव्हा आमच्याजवळच असलेल्या पाच लोकांच्या एका कुटुंबाने आम्हाला बुडण्यापासून वाचवलं. आम्ही दोघं खूप चांगले स्विमर आहोत, पण कधी कधी तुमची परीक्षा घेतली जाते.' 'माझ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं होतं, तेव्हा आम्ही मदतीसाठी ओरडू लागलो. यादरम्यान आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी आयआरएस अधिकारी यांनी आमचे प्राण वाचवले. या घटनेनंतर आम्ही सुन्न झालो होतो. त्या संपूर्ण घटनेदरम्यान देव आमची सुरक्षा करत होता, अशी जाणीव झाली. आमचा जीव वाचवल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. या एका घटनेमुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला', असं त्याने पुढे लिहिलं.

 
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचं चॅनल 'बीअर बायसेप्स' नावाने प्रसिद्ध आहे. युट्यूबवर त्याचे सहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रणवीर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच गर्लफ्रेंडसोबतचेही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र यामध्ये त्याने तिचा चेहरा इमोजीने लपवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणवीर हा टीव्ही अभिनेत्री निक्की शर्माला डेट करत असल्याचं कळतंय. निक्कीने 'शिव शक्ती', 'माइंड द मल्होत्रा', 'जन्म जन्म' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.