१०० पैकी फक्त ८२ लोकांनाच मिळाला हेल्थ इन्शुरन्स क्लेम? दावा फेटाळण्याची ४ मुख्य कारणे
गेल्या काही वर्षात आरोग्य विम्याचं महत्त्व लोकांना बऱ्यापैकी समजलं आहे. आरोग्य विमा उतरवणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवरुन हे स्पष्ट होते. मात्र, २०२४ या वर्षात आरोग्य विम्याबाबत आलेली आकडेवारी धक्कादायक आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आरोग्य विमा दावे केलेल्या १०० पॉलिसीधारकांपैकी विमा कंपन्यांनी केवळ ८२ जणांना पैसे दिले. म्हणजे तब्बल १८ टक्के दावे फेटाळण्यात आले. विमा नियामक IRDAI ने ही माहिती दिली आहे. विमा नियामकाच्या अहवालानुसार, १.१ लाख कोटी किमतीचे ३ कोटी दावे नोंदवले गेले. याशिवाय, मागील वर्षांच्या तुलनेत ६,२९० कोटी किमतीचे १७.९ लाख प्रलंबित दावे देखील होते. एकूण दाव्यांपैकी, विमा कंपन्यांनी अंदाजे २.७ कोटी दावे निकाली काढले आणि पॉलिसीधारकांना ८३,४९३ कोटी रुपये दिले. हे दावे का फेटाळलेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विमा कंपन्या आरोग्य विमा प्रीमियम म्हणून १.१ लाख कोटी रुपये गोळा केले. त्याचवेळी ८३,४९३ कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी सर्वाधिक प्रीमियम गोळा केला होता. या सरकारी कंपन्यांनी ४०,९९३ कोटी रुपये जमा केले. तर खासगी कंपन्यांनी ३४,५०३ कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला आणि स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांनी ३२,१८० कोटी रुपये प्रीमियम गोळा केला.
सरासरी दाव्याचे पेमेंट किती होते?
प्रति दावा सरासरी पेमेंट ३१,०८६ रुपये होते. क्लेम सेटलमेंटमध्ये, ७२% दावे TPAs (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर) द्वारे निकाली काढण्यात आले, तर २८% दावे कंपनीच्या इन-हाउस सिस्टमद्वारे निकाली काढण्यात आले. पेमेंट पद्धतीबद्दल बोलायचे झाल्यास, ६६.१६% दावे कॅशलेस मोडमध्ये निकाली काढण्यात आले. तर, ३९% दावे प्रतिपूर्ती पद्धतीने निकाली काढण्यात आले.
किती लाख दावे फेटाळले?
विमा कंपन्यांनी १०,९३७ कोटी किमतीचे ३६ लाख दावे फेटाळले. ७,५८४ कोटी रुपयांचे २० लाख दावे अद्याप प्रलंबित आहेत. नाकारलेले दावे म्हणजे जे कागदपत्रांच्या छाननीनंतर नाकारले जातात. दरम्यान, विमा लोकपाल कार्यालयाकडे यावर्षी आरोग्य विम्याशी संबंधित ३४,३३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मागील वर्षांतील २,८४६ तक्रारी प्रलंबित होत्या. यापैकी ६,२३५ तक्रारींवर पॉलिसीधारकाच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि चंदीगड येथून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
वैद्यकीय दावे का नाकारले जातात
प्रतीक्षा कालावधी : काही आरोग्य विमा ठराविक आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी देतात. या काळात केलेला दावा नाकारला जातो.
माहिती लपवणे : दावा नाकारण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पॉलिसी खरेदी करताना तुम्ही आधीच अस्तित्वात असलेले आजार लपवणे.
लॅप्स्ड इन्शुरन्स पॉलिसी : जर तुमची विमा पॉलिसी संपली असेल किंवा तुम्ही एखादा प्रीमियम चुकवला असल्यास तुमचा विमाकर्ता तुम्हाला वैद्यकीय कव्हरेज नाकारू शकतो.
दावा करण्यात विलंब : प्रत्येक विमा पॉलिसीला दावा करण्यासाठी विशिष्ट वेळ मर्यादा असते. जर तुम्ही निर्धारित वेळेत दावा करू शकला नाही, तर तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.