पत्नीचा मृत्यू तर सासू, मेव्हणा, मुलगा जखमी
हिंगोली:-हिंगोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास मुकाडे या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस शिपायाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये पोलिसाची सासू, लहान मुलगा आणि मेहुणा जखमी झाले असून सर्वांवर जिल्हा ग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विलास मुकाडे या पोलीस कर्मचाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. मात्र त्याने हे पाऊल का उचललं? याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली आहे. आरोपी विलास मुकाडे याने चार राऊंड फायर केल्या. त्याने पहिली गोळी आपल्या पत्नी मयुरीवर झाडली. या गोळीबारात मयुरी हिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी गोळी त्याने आपल्या पोटच्या अवघ्या दोन वर्षाच्या मुलावर झाडली. त्याच्या मुलाच्या पायाला ती गोळी लागली. तिसरी गोळी आरोपीने आपल्या सासूवर झाडली. सासूला पोटात ती गोळी लागली.
तर चौथी गोळी आरोपीने मेहुण्यावर झाडली. त्याच्या बरगड्यांमध्ये ती गोळी गेली. या गोळीबारानंतर आरोपी हा फरार झाला. तर दुसरीकडे जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण आरोपीची पत्नी मयुरी हिचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तीन जण या घटनेत बचावले आहेत. आरोपीचा मुलगा, सासू आणि मेहुणा यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यानंतर लगेच तपासाला सुरुवात केली. अखेर घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिक्षक कृष्णा कोकाटे यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.