मुंबई मेट्रोला दिशा देणाऱ्या आणि निर्धारित वेळेत मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा सुरु करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली झाली असून त्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
मावळते मुख्य सचिव IPS ब्रिजेश कुमार यांच्याकडून त्या पदभार स्विकारणार आहेत. अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानं त्या आता मंत्रालयातून आपलं कामकाज पाहणार आहेत. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांच्या बदलीचं पत्र काढण्यात आलं आहे. मावळते मुख्य सचिव ब्रिजेश कुमार यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावानं त्यांनी मुख्य सचिवपदाचा आपला पदभार स्विकारावा तसंच सध्या त्यांच्यावर मुंबई मेट्रोच्या कार्यकारी संचालकपदाची जी जबाबदारी आहे, ती देखील पुढील आदेशापर्यंत कायम ठेवावी, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू अधिकारी मानल्या जातात. मुंबई मेट्रो-३ ची जबाबदारी २०१४ मध्ये फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच्या काळातच त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. जी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली, म्हणूनच आता त्यांच्यावर फडणवीसांनीच मुख्य सचिवपदाची जबाबदारी देखील सोपवली आहे. आपल्या कामात राजकीय हस्तक्षेपाला न जुमानणाऱ्या अधिकारी अशी अश्विनी भिडे यांची ओळख आहे. मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेच्या जंगलातील मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यानंतर त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. पण त्यांनी पर्यावरणवाद्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, अश्विनी भिडे यांनी यापूर्वी देखील मुंबईच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या प्रकल्पांच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्विकारली आहे. यामध्ये मुंबई महानगर विकास प्राधिकारण अर्थात एमएमआरडीएच्या प्रमुख असताना त्यांनी ईस्टर्न फ्री वे, सहार एलेवेटेड रोड, मोनोरेल फेज - १ तसंच अनेक फ्लायओव्हर यांसारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.