Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न

मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न
 

धाराशिव: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही अशाचप्रकारचा अनर्थ थोडक्यात टळल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणाऱ्या नामदेव निकम जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला.

नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. गुरुवारी रात्री काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नामदेव निकम हे बारुळ गावातून आपल्या मेसाई जवळगा गावाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. नामदेव निकम हे आपल्या चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी काही गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. 
 
मात्र, सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावला. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आता याठिकाणी थेट सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि गुन्हेगारांना कधी पकडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरपंच नामदेव निकमांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मी रात्री तुळजापुरवरुन जवळग्याला परतत होतो. त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन बाईक आल्या. बाईकस्वार सतत हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असे आम्हाला वाटले आणि आम्ही गाडी रस्ताच्या मधोमध आणून स्लो केली. आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला. डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. 
 
तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो. त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली. अंडी फेकल्यामुळे समोरचं काही दिसेनासे झाले. त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली. त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, असे नामदेव निकम यांनी म्हटले. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा, असा माझा संशय आहे. असे सुरु राहिल्यास आम्ही काम कसे करणार? मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरे होईल, असे नामदेव निकम यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.