वायफळेतील तरूणाच्या खूनप्रकरणी सराईत गुन्हेगाराला चोवीस तासात अटक चार ते पाच साथीदार पसार, सांगली एलसीबीची खेड-शिवापूरजवळ कारवाई
सांगली : तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर कोयता, तलवारीने फाळके कुटुंबियांवर हल्ला करून एका तरूणाचा भर चौकात खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. फाळके कुटुंबाशी पूर्वी असलेल्या वादातून पुण्यासह वायफळे परिसरातील साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खेड-शिवापूरजवळील एका हॉटेलजवळ संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
विशाल सज्जन फाळके (वय 32, रा. पुणे, मूळ रा. वायफळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ओंकार उर्फ रोहित संजय फाळके (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार (सर्व रा. वायफळे, ता. तासगाव), आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे (दोघेही रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) जखमी झाले आहेत. वायफळे येथील विशाल फाळके आणि मृत ओंकार फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून दोन्ही कुटुंबाने एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले केले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. ओंकारच्या कुटुंबियांनी विशालसह त्याच्या कुटुंबियांविरोधात केलेल्या तक्रारीची केस मागे घेण्यासाठी विशालने हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.
विशाल फाळके सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव, पुण्यातील भारती विद्यापीठ, वारजे-माळवाडी, बिबवेवाडी, शिवाजीनगर या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. त्याने वायफळेतील ओंकार आणि त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केल्यानंतर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यातील संशयितांना तातडीने अटक करण्याच्या सूचना कोल्हापूर परिश्रेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. तांत्रिक माहिती आणि खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनंतर एलसीबीचे पथक खेड-शिवापूर परिसरात त्याचा शोध घेत होते. त्यावेळी एका हॉटेलजवळ तो सापडला. त्याला अटक करण्यात आली.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, संदीप शिंदे, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदय साळुंखे, अतुल माने, प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, विक्रम खोत, सुमित सूर्यवंशी, सतीश माने, अमोल लोहार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.