आता घरबसल्या मिळणार गंगाजल; पोस्टाने आणली गंगाजल योजना
बडनेरा : धार्मिक कामांसाठी गंगाजलचे महत्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीचे जल पवित्र मानले जाते. अनेक धार्मिक विधींमध्ये गंगाजलला विशेष महत्त्व आहे. पवित्र गंगाजल आणण्यासाठी आता भाविक भक्तांना गंगोत्री किंवा ऋषिकेशला जाण्याची गरज नाही.
डाक विभागामार्फत गंगोत्री येथील बाटलीबंद गंगाजल उपलब्ध करून दिले जाते. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमधून गंगाजल तुम्ही मिळवू शकता, ऑनलाइनदेखील मागवू शकता. २५० मिली गंगाजलच्या बॉटल या पोस्ट ऑफिस कार्यालयात उपलब्ध आहेत.
पोस्टाने आणली गंगाजल योजना...
तुमच्या घरापासून जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून तुम्ही गंगाजल मागवू शकता, तसेच https://epostoffice.gov.in या संकेतस्थळावर खाते उघडून आपली मागणी नोंदवू शकता.
३० रुपयांमध्ये २५० मिली
गंगाजलच्या २५० मिली बॉटलसाठी ३० रुपये आकारले जातात. घरपोचही गंगाजलची बॉटल मिळते. त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात.
या वर्षात ३२९ घरात पोहोचले गंगाजल...
पोस्टाच्या माध्यमातून अमरावतीत एप्रिल २०२४ ते डिसेंबर महिन्यापर्यंत ३२९
भाविकांनी गंगाजलाची मागणी केली आहे.
गंगाजल ऑनलाइन ऑर्डर करता येते का?
गंगाजल ऑनलाइन ऑर्डर करता येते. त्यासाठी पोस्टाच्या वेबसाइटवर भेट देऊन नोंदणी करावी लागते. यानंतर घरपोच गंगाजल पुरविल्या जाते. परंतु त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.श्रावणात होती मागणी
श्रावण महिना हा पूजाअर्चा करण्याचा महिना असतो. अनेक जण या महिन्यात अभिषेक करतात. त्यामुळे या महिन्यामध्ये गंगाजलाची मागणी वाढली असते. तुम्हालाही गंगाजल हवंय ! काय कराल? गंगाजल मागविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करावी लागते किंवा पोस्टाच्या वेबसाइटवर मागणी नोंदविता येते.
गंगाजलला नागरिकांचा प्रतिसाद....
"गंगाजलला विशेष महत्त्व प्राप्त आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पोस्टाने ही योजना सुरू केली आहे. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसमधून तुम्ही गंगाजल घेऊ शकता. नागरिकांचा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे." - सुजित कुमार लांडगे, प्रवर पोस्ट मास्तर, मुख्य डाकघर अमरावती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.