छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहाची अतिशय दयनीय अवस्था पाहून आधीच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी काही काम केले आहे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला.
सामाजिक न्याय खात्याचे आधी कसे काम चालत होते, हे मला माहिती नाही. पण मी पदभार स्वीकारल्यानंतर खात्यात अनेक बदलांची गरज असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. वसतिगृहाची पाहणी करताना त्यांना एका खोलीच्या कपाटात बिअरची बॉटल दिसली. त्यावेळी त्यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी अधिकाऱ्यांची शाळा घेत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून उर्वरीत कारवाई लगोलग करू असे सांगितले.
पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून छत्रपती संभाजीनगरच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळीच वसतिगृहाला भेट दिली. यावेळी तेथील भीषण परिस्थिती पाहून मंत्री शिरसाट हादरून गेले. एवढी भीषण अवस्था असल्यावर विद्यार्थी शिकणार तरी कसे? अभ्यासात त्यांचे मन कसे लागणार? अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना मंत्री शिरसाट यांनी फैलावर घेतले.
पाहणी करण्यासाठी गेले, रुममध्ये जाताच बिअरची बॉटल दिसली, पदभार घेताच ॲक्शन मोडवर
वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर जनावरही तिथे राहणार नाही, असे मला वाटते. नळाला पाणी नाही. सहाव्या मजल्यावरचे विद्यार्थी तळमजल्यावर येऊन पाणी नेत आहेत. एका रूममध्ये तर बिअरची बॉटल आढळली. वसतिगृह सांभाळण्यासाठी पाच अधिकारी आहेत. त्यातील काही अधिकारी सुट्टीवर आहेत. मी येणार हे माहिती असूनही एक महिला अधिकारी आलेल्या नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. काही जणांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहेत. शासन करोडो रुपये विद्यार्थ्यांवर खर्च करते आहे परंतु तरीही वसतिगृह अशा अवस्थेत आहेत. राज्याची दशा यावरून काही वेगळी असेल असे वाटत नाही. आधी काय झाले मला माहिती नाही, मात्र मी पदभार घेतल्यानंतर असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा मंत्री शिरसाट यांनी दिला.
कोट्यवधींचा निधी जातो कुठे?
कोट्यवधींच्या निधीनंतरही वसतिगृहाची अशी दुरावस्था असेल तर याला अधिकारी जबाबदार असेल. शासनाने दिलेले पैसे कुठे जातात, हा मला प्रश्न आहे. याचे उत्तर मी समाज कल्याण आयुक्तांकडून घेणार आहे. गुरुवारी याबाबतीत बैठकीचे आयोजन केले असून याप्रश्नी लवकरच मोठा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री शिरसाट यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.