गडचिरोली : जिल्हा न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याकडून स्वतःची बंदूक हाताळताना ८ राऊंड फायर होऊन त्यातील ३ गोळ्या स्वतःच्या छातीत घुसल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
उमाजी होळी असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोवालदार उमाजी होळी, हे जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते. जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील आवारात गाडीत बसलेले होते. यावेळी त्यांच्या स्वत:च्या ताब्यातील बंदुक हाताळताना गोळी झाडली जाऊन ८ पैकी ३ गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते.
त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केले. प्रथमदर्शनी होळी यांच्याकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते, असेही पोलिसांनी म्हंटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.