विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असेलेला राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) महायुतीसोबत जाणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
शरद पवार यांच्या पक्षातील एका बड्या नेत्याची भाजपच्या केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. तीही उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी. त्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सपाटून मार खाल्ला. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील आमदार आणि खासदारांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीत 4 डिसेंबरला शरद पवारांच्या खासदारांची एक बैठक झाली. या बैठकीत आपण सत्तेत गेलो पाहिजे, असा सूर खासदार आणि आमदारांचा होता. पण, यावरून दोन गट पडल्याचं सांगितलं जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असं एका गटाचं मत आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील व्हावे, असा मुद्दा दुसऱ्या गटानं लावून धरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांची इच्छा सत्तेत सामील होण्याची आहे. त्यासह भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं शरद पवार यांच्या नेत्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील भूमिकेबद्दलही माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फुटींच्या चर्चेवर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, "प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांना शरद पवार यांचे 5 खासदार फोडा मग तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देऊ, अशी ऑफर दिली आहे. पण, शरद पवार यांनी कष्टाने खासदार निवडून आणले. हे त्यांचा पक्ष फोडत आहेत. फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.""खासदारांनी अजितदादांसोबत जाणे किंवा भाजपसोबत जाणे, ही एकच गोष्ट आहे. मी शरद पवार यांना ओळखतो. पुरागामी, धर्मांद आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांपासून शरद पवार कधीही दूर जाणार नाहीत. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे-नौशे आणि जे घाबरून पळून गेले आहेत, त्यांच्या नादी लागून शरद पवार वेगळा विचार करणार नाहीत," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला."या सगळ्यांसाठी गौतम अदानी मध्यस्थी करत आहेत. गौतम अदानींच्या घरी राजकीय चर्चा होतात. ते महाराष्ट्राचं राजकीय भविष्य ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. गौतम अदानींनी विमानतळ, धारावीची जमीन गिळली. हे अदानी आता महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भविष्य ठरविणार आहेत. गौतम अदानी विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, दादा धर्माधिकारी, जमनलाल बजाज आहेत का?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे."गौतम अदानी राजकारणांच्या गटात-तटात मध्यस्थ होऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदींचे मित्र असलेले अदानी महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करत असल्यानं गोंधळ सुरू आहे. आता अदानी महाराष्ट्रात राजकारण करणार का? जे अदानींच्या घरी मुंड्या खाली घालून बसत आहेत, त्यांना मराठी माणूस म्हणून घ्यायला लाज वाटती पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
दरेकर अन् अनिल पाटलांचाही दावा….
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार हे महायुतीच्या संपर्कात आहेत, असं भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी बुधवारी सांगितलं. काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.