नांदेड: रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये हॉर्न का वाजवला, म्हणत एका तरुणाने चक्क कारवर चढून चालकाला मारहाण केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आयटीआय चौकात घडली.
एका चित्रपटामध्ये शोभेल अशा प्रसंगाचा व्हिडिओ शहरात व्हायरल झाला आहे. नांदेड येथील प्रकाश नागरगोजे हे डॉक्टर आहेत. लोहा तालुक्यातील मालकोळी येथे त्यांच रुग्णालय आहे. आज सकाळी अकरा वाजता नेहमी प्रमाणे डॉ. नागरगोजे वाहनातून हॉस्पिटकडे निघाले. साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील आयटीआय चौकात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाला होता. यामुळे डॉ. नागरगोजे यांनी कारचा हॉर्न वाजवला. यावेळी पाठीमागून एक अनोळखी तरुण आला आणि डॉ. नागरगोजे यांच्यासोबत वाद घालू लागला.
हॉर्न का वाजवला, किती वेळ रस्त्यावर गाडी थांबवतो, असे म्हणत तरुणाने डॉ. नागरगोजे यांच्या सोबत हुज्जत घातली. तसेच आक्रमक होत तरुण अचानक कारवर चढला. त्यानंतरही त्याने डॉ. नागरगोजे यांना मारहाण सुरूच ठेवली. त्यामुळे डॉ. नागरगोजे यांनी कार थेट शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे आणली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.