सांगली:- बेणापूर येथे बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, एक काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
किशोर विलास जाधव (वय २२, रा. हिवरे, ता. खानापूर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. निरीक्षक शिंदे यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले होते. पथक विटा परिसरात गस्त घालत असताना भिवघाट रस्त्यावरील बेणापूर परिसरात एक तरूण बेकायदा पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने बेणापूर येथे सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. ते जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, सुशील मस्के, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.