लंडनः अन्य देशात जायचे असेल तर पासपोर्ट, व्हिसा अशी कागदपत्रे असणे आवश्यक असते; मात्र जगाच्या पाठीवर तीन व्यक्ती अशा आहेत ज्यांना कुठेही जाण्यासाठी पासपोर्टची गरज नाही. त्यांना काही खास विशेषाधिकार प्राप्त आहेत, ज्यामुळे ते कोणत्याही दस्तावेजाशिवायच कोणत्याही देशात जाऊ शकतात. या तीन व्यक्ती म्हणजे ब्रिटनचे राजे तसेच जपानचे सम्राट व सम्राज्ञी.
ज्यावेळी या व्यक्ती परदेशात जातात, त्यावेळी कुणीही त्यांना पासपोर्टबाबत विचारत नाही. त्यांना पूर्ण सन्मान दिला जातो. अर्थात, जुन्या जमान्यात पासपोर्टसारख्या कागदपत्रांबाबत विचारलेही जात नसे. पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान पासपोर्टची आवश्यकता भासू लागली. त्यानंतर प्रत्येक देशाने ते अनिवार्य केले. 1920 मध्ये परिस्थिती वेगाने बदलली. अमेरिकेने अवैध प्रवाशांना रोखण्यासाठी पासपोर्ट प्रणालीची सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्र संघातही याबाबतच्या मुद्द्यावर चर्चा झाली. अखेर 1924 मध्ये अमेरिकेने आपली नवी पासपोर्ट प्रणाली लागू केली. त्यानंतरच्या काळात एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना पासपोर्टसारखी कागदपत्रे आवश्यक बनली. सध्याच्या काळात पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक आवश्यक दस्तावेज बनला आहे. त्यामध्ये नाव, पत्ता, वय, फोटो, नागरिकत्व आणि हस्ताक्षर अशा स्वरूपाची माहिती असते. एखाद्या व्यक्तीची ओळख व त्याचे नागरिकत्व त्यामधून समजते.
सध्या बहुतांश देशांमध्ये ई-पासपोर्ट जारी केलेले आहेत, जे डिजिटल सुरक्षा आणि सुविधाजनक ओळखीसाठी वापरले जाते; मात्र अशा काळातही या तीन व्यक्ती आंतरराष्ट्रीय प्रवासावेळी पासपोर्टच्या बंधनातून मुक्त आहेत. सध्या ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय हे आहेत व त्यांच्या पूर्वी हा विशेषाधिकार महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे होता. चार्ल्स राजा बनताच त्यांच्या सचिवाने देशाच्या परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून सर्व देशांना अधिकृत संदेश पाठवला की, किंग चार्ल्स तिसरे हे आता ब्रिटिश शाही परिवाराचे प्रमुख आहेत आणि त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जगभर प्रवास करण्याची अनुमती दिली जावी.
ब्रिटिश राजाला हा विशेषाधिकार असला, तरी त्यांच्या पत्नीला तो नाही. राणी किंवा शाही कुटुंबातील अन्य सदस्यांना परदेश प्रवासावेळी आपला कौन्सुलर पासपोर्ट जवळ ठेवावा लागतो. शाही परिवारातील महत्त्वाच्या सदस्यांना राजनैतिक पासपोर्टही दिला जातो, जो त्यांची विशेष स्थिती दर्शवतो. त्यांना प्रवासावेळी विशेष सन्मान व सुविधा दिल्या जातात. जपानचे सध्याचे सम्राट आहेत नारुहितो. त्यांना व त्यांच्या पत्नी मसाको ओवाटा यांनाही पासपोर्टशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करता येतो. सम्राट अकिहितो यांनी आपले पद सोडल्यावर त्यांचे चिरंजीव नारुहितो हे राजसिंहासनावर आले होते व त्यानंतर त्यांना व त्यांच्या पत्नीला हा अधिकार मिळाला. जगातील सर्व पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांना अन्य देशांच्या प्रवासावेळी विशेष कौन्सुलर पासपोर्ट जवळ ठेवावा लागतो. अशा नेत्यांना सुरक्षा तपासणी व अन्य प्रक्रियेतून सूट मिळते. भारतात हा दर्जा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांना आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.