मुंबई: महाराष्ट्रात महायुतीचे पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी नाईक यांच्याकडे होती. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद देण्यात आले आहे. यापूर्वी मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख होते. आता त्यांच्या जागेवर डॉ. रामेश्वर नाईक यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती. या कक्षाचे काम किती प्रभावीपणे होऊ शकते आणि त्याचा सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी किती फायदा होऊ शकतो, याची पहिल्यांदा प्रचिती एकनाथ शिंदे यांच्या काळात आली. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांची जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता. या विभागाच्या माध्यमातून शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली होती.
मंगेश चिवटे यांनी यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आणि खास मर्जीतील व्यक्ती म्हणून मंगेश चिवटे यांना ओळखले जात होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मंगेश चिवटे यांनी मोठी भूमिका पार पाडली. त्यामुळे अल्पावधीत राज्यात आणि प्रशासनात मंगेश चिवटे हे नाव प्रसिद्ध झाले होते. मात्र, आता चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांना मोठा झटका दिल्याची चर्चा रंगली आहे.
कोण आहेत रामेश्वर नाईक?
डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2014 मध्ये नाईक यांची वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून देकील काम पाहिले आहे. जुलै 2021 मध्ये रामेश्वर नाईक वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली होती. महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात डॉ. रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी देण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.