सांगली जिल्ह्यात ४० आयटी कंपन्या, देश-विदेशात सॉफ्टवेअरची निर्यात
सांगली : सांगलीत आयटी पार्कचा विचार सुरू होण्यापूर्वीच अनेक व्यावसायिकांनी स्वत:पुरते स्वतंत्र व्यवसाय सुरू केले होते. आजमितीला सांगली, मिरजेत ४० हून अधिक आयटी व्यवसाय पाय रोवून आहेत.
देशांतर्गत कंपन्यांसोबतच विदेशातही सॉफ्टवेअरची निर्यात करत आहेत.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून झालेली निर्यातही लक्षवेधी आहे. तेथील सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची निर्यात केली होती. ती २०२३-२४ मध्ये ५० टक्क्यांनी वाढून १८९ कोटी रुपयांवर पोहोचली.
सध्या कोल्हापूर व परिसरात ३५० आयटी कंपन्या कार्यरत आहेत, त्या तुलनेत सांगलीत या व्यवसायाचा विस्तार खूपच छोटा आहे. तो वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील ४० हून अधिक आयटी कंपन्यांनी सांगली-मिरज आयटी असोसिएशनच्या स्थापना केली आहे. पण, संघटना म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी फारच कमी काम होते. प्रत्येक व्यावसायिक स्वबळावर व्यवसायाचा विस्तार करत आहे. सॉफ्टवेअर निर्यात करत आहे.
सांगलीचे टॅलेंट कॅनडा, ऑस्ट्रियाला
सांगलीतील आयटी कंपन्यांमधून कॅनडा, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड, आफ्रिका, फ्रान्स आदी देशांत साॅफ्टवेअरची निर्यात केली जाते. स्वत:ची बुद्धिमत्ता आणि क्षमता दाखवत या कंपन्यांनी तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. या साखळीतून आणखी काही कंपन्या सांगलीतून सॉफ्टवेअर घेण्यास उत्सुक आहेत.
टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्या
सांगलीतून आयटी सेक्टरचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुण्या-मुंबईची वाट धरणाऱ्या तरुणांना सांगलीतच थांबवायला हवे. हे ब्रेन ड्रेन रोखायला हवे. त्यासाठी एखादी मदर इंडस्ट्री स्वरूपाची आयटी कंपनी येथे येणे आवश्यक आहे. यासंदर्भात सांगली-मिरज आयटी असोसिएशनने इन्फोसिस, टीसीएस अशा काही दिग्गज कंपन्यांशी संपर्क केला होता. पण सांगलीत पायाभूत सुविधा नसल्याने त्या थबकल्या.
वर्षाला दीड हजारांवर पदवीधर
सांगली जिल्ह्यात १७ हून अधिक महाविद्यालयांत आयटीविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यातून वर्षाला दीड हजारांवर पदवीधर बाहेर पडतात. यापैकी बहुतांशी तरुण मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, चेन्नई आदी शहरांची वाट धरतात. त्यामुळे जिल्ह्यात बुद्धिमान विद्यार्थ्यांची कमी नाही हे स्पष्ट होते. हे तरुण सांगलीतच थांबल्यास जिल्ह्याचा जीडीपी वाढण्यास हातभार लावतील हे निश्चित.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.