चुरू : चुरू जिल्ह्यामध्ये एका 19 वर्षांच्या शिक्षिकेने प्रेम विवाह केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या शिक्षिकेच्या कुटुंबाने रतनगड पोलीस स्टेशनमध्ये तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. महिला शिक्षिका आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मुलीच्या घरच्यांना तिचं लग्न नातेवाईकांमध्येच करायचं होतं, पण तिला हे नातं पसंत नव्हतं. मुलीने घरामध्ये तिच्या आवडीविषयी काहीच सांगितलं नाही आणि ती घर सोडून पळून गेली.
रतनगडच्या अनिता सिहाग खासगी शाळेमध्ये शिक्षिका आहेत. झुंझुनू जिल्ह्याच्या चिडावामध्ये राहणाऱ्या 25 वर्षांच्या राहुल कुमार डांगीसोबत त्यांनी प्रेम विवाह केला आहे. राहुल कुमारने एमकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे, तसंच तो स्पर्धा परिक्षेची तयारीही करत आहे. एक वर्षापूर्वी घरात झालेल्या एका लग्नात आमची भेट झाली आणि मग आम्ही मोबाईलवर बोलायला सुरूवात केली, असं अनिता सिहाग यांनी सांगितलं.आपण राहुलबद्दल घरी काहीही सांगितलं नव्हतं. 3 वर्षांपूर्वी घरच्यांनी माझ्या लग्नाबाबत बोलणी सुरू केली होती. भावाच्या लग्नाच्या बदल्यात माझं लग्न लावलं जाणार होतं, पण मला हे लग्न पसंत नव्हतं. माझे वडील परदेशात राहतात. जानेवारी 2025 मध्ये ते इकडे आल्यानंतर माझं लग्न होणार होतं, पण मी 16 डिसेंबरला सकाळी शाळेत जायच्या बहाण्याने बाहेर पडले आणि पळाले, असं अनिताने सांगितलं आहे.
17 डिसेंबरला प्रेम विवाह
घरातून पळाल्यानंतर अनिता राहुलसोबत जयपूरला गेली, तिकडून दोघं गाझियाबादला पोहोचले आणि त्यांनी 17 डिसेंबरला लग्न केलं. राहुलने या लग्नाबाबत त्याच्या घरी सांगितलं. त्याच्या घरच्यांना या लग्नाबाबत काहीही आक्षेप नाही, पण अनिताच्या घरच्यांनी रतनगड पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दिली आहे. माझे 11 भाऊ आहेत, आणि आता ते धमकी देत आहेत, त्यामुळे आम्ही सुरक्षा मागण्यासाठी एसपी कार्यालयात आलो आहोत, असं अनिता म्हणाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.