मुंबई : पॅन कार्ड हे भारतीयांचं सर्वात महत्वाचं दस्ताऐवज आहे. त्यामुळे ते 18 वर्षावरील प्रत्येक भारतीयाकडे असतं. आता पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोमवारी, केंद्रातील मोदी सरकारने PAN/TAN 1.0 च्या जागी पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, यासाठी सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे. हे पॅन कार्ड 1.0 प्रकल्पाची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल आणि त्यात QR कोड देखील असेल.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत 2025 पासून हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे, त्यामुळे आता QR कोड असलेले पॅन कार्ड जारी केल्यानंतर जुन्या पॅनकार्डचे काय होणार, असे प्रश्न लोकांमध्ये उपस्थित केले जात आहेत. शिवाय नवीन पॅनकार्डसाठी काय करावे लागेल, ते कसे आणि कुठे बनवले जाईल? यासाठी किती पैसे मोजावे लागतील या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
PAN 2.0 ची वैशिष्ट्ये आणि फायदे
नवीन QR कोडसह येणाऱ्या पॅन कार्डमुळे बनावट कार्ड सहज ओळखता येणार आहे. यामुळे एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येणार नाही. करदात्यांना त्यांच्या पॅनमध्ये सुधारणा करण्यासाठीच नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.
सध्याचं पॅन कार्डच वैध राहणार
PAN 2.0 लागू झाल्यानंतरही सध्याचे पॅन कार्ड वैध राहणार आहेत. करदाते त्यांचा पॅन कार्ड पूर्वीप्रमाणेच कर भरण्यासाठी, टीडीएस/टीसीएस क्रेडिटसाठी, आणि आर्थिक व्यवहारांसाठी वापरू शकतात. पॅन कार्ड फक्त तेव्हा बदलले जाईल, जेव्हा करदात्याला त्याच्या माहितीमध्ये सुधारणा करायची असेल.
नवीन QR कोड पॅन कार्ड कसे मिळवायचे?
PAN 2.0 अंतर्गत नवीन QR कोड पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी onlineservices.nsdl.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ही सेवा संपूर्णतः विनामूल्य असेल आणि नवीन पॅन कार्ड करदात्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर मोफत पाठवले जाईल.
करदात्यांसाठी महत्त्वाची टीप
सध्याचे पॅन कार्डधारकांना फक्त त्यांच्याच गरजेनुसार नवीन QR कोड पॅनसाठी अर्ज करावा लागेल. जर सुधारणा करण्याची गरज नसेल, तर सध्याचे पॅन कार्ड वापरायला पूर्णतः वैध आहे. PAN 2.0 प्रोजेक्टमुळे करदाते आणि सरकार दोघांसाठीही अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रणाली निर्माण होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.