धुळे : किसान सन्मान योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार रूपये मिळत होते, मात्र त्यात वाढ करून ते आता १५ हजार देण्यात येतील म्हणून शेतकऱ्यासह सर्वच नागरिकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी येथील जनक व्हिला कार्यालयातील मैदानावर मंगळवारी आयोजित प्रचार सभेत केले.
शिरपूर विधानसभा मतदार संघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. सभेला माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, तालुकाध्यक्ष किशोर माळी आदी उपस्थित होते. इराणी म्हणाल्या की मी दुसऱ्यांदा या शहरात आली आहे. यापूर्वी येथे आली असताना खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा होता हे समजलं नाही. मात्र आता भाजपाच्या सरकारने गुळगुळीत रस्ते तयार केल्यामुळे प्रवास आता फारसा जाणवत नाही. मोदी सरकारने संकल्प केला आहे की, ४० हजार गावांमध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते तयार करणार. आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, शिरपूर तालुक्याच्या विकासाशिवाय दुसरे कोणतेच काम आतापर्यंत केलेले नाही.
तालुक्यात २० वर्षापासून शिरपूर पॅटर्न अंतर्गत आतापर्यंत ४०० हून अधिक बंधारे बांधून पावसाचे पडणारे पाणी अडविले जात आहे. त्यामुळे शेतकरी आता बारमाही पिके घेवू लागली आहेत. यापूर्वी, हजारो मुले शिक्षणासाठी पुणे-मुंबई-नाशिक-इंदूर येथे जात होते. आता तब्बल २७ हजारहून अधिक मुले शिक्षण या शहरात घेत आहेत. आमदार काशिराम पावरा म्हणाले, गेल्या १५ वर्षात विकासाची कामे केलीत मात्र त्यापेक्षा अधिक पटीने या निवडणूकीत करण्याचा प्रयत्न राहील.
पब्लिक है सब जानती है
* किसान सन्मान योजना, वृध्दाधार योजना, लाडकी बहिण योजना आदी योजनांची माहिती देताना त्यांनी भाजपचा उमेदवार कोण, मतदानाची तारीख काय असे प्रश्न उपस्थित महिलांना विचारले. महिलांचे उत्तर ऐकल्यावर त्या आनंदाने म्हणाल्या की, ये पब्लिक है सब जानती है. त्यांना महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.