मुंबई: मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चेचा पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्यावेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्यात 2019ला आमच्या 105 जागा आल्या. आता त्याहीपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. त्यापेक्षा कमी येणार नाहीत. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यापूर्वी एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपण इच्छूक नसल्याचे सूतोवाच केले होते. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा का मिळाल्या, या प्रश्नाचे उत्तर दिले. एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जास्त जागा, स्ट्राइक रेट असे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.